दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर बससेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:58+5:302021-04-13T04:14:58+5:30
जळगाव आगार : अनेक लांब पल्ल्याच्या मार्गावर जळगाव : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गावरील सेवा सोमवारपासून पुन्हा ...
जळगाव आगार : अनेक लांब पल्ल्याच्या मार्गावर
जळगाव : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गावरील सेवा सोमवारपासून पुन्हा पूर्ववत सुरू झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर, माहूरगड मार्गावरच्या बसेस वेळापत्रकाप्रमाणे रवाना झाल्या. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांचा या बसेसला अल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्याने शासनातर्फे शनिवार व रविवार असा दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे बाजारापेठा, आठवडे बाजार, मॉल आदी गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे याचा महामंडळाच्या बससेवेवर मोठा परिणाम झाला. प्रवाशांचा अल्पप्रतिसाद असल्यामुळे उत्पन्नही निम्म्यावर आले होते.
दरम्यान, सोमवारी लॉकडाऊन उघडल्यानंतर सकाळपासून जळगाव आगारातील बसेस जिल्हाभरात विविध ठिकाणी व इतर जिल्ह्यांमध्ये रवाना झाल्या. दुपारपर्यंत वेळापत्रकाप्रमाणे अनेक गावांच्या बसेस रवाना झाल्याचे सांगण्यात आले. तसेच सायंकाळच्या पुणे येथे जाणाऱ्या बसेसही वेळापत्रकाप्रमाणे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी बस होण्यापूर्वी प्रत्येक बस निर्जंतुक करून रवाना करण्यात आली.