प्लॅस्टिक बंदीबाबत जळगावात व्यापारी वर्ग अद्यापही संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:40 PM2018-06-24T12:40:23+5:302018-06-24T12:41:46+5:30
स्पष्ट खुलासा होणे गरजेचे
जळगाव : प्लॅस्टिक बंदीबाबत अद्यापही व्यापारी वर्गात संभ्रम असून सरकारने बंद असलेल्या प्लॅस्टिक वस्तूंबाबत स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
राज्यात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली असली तरी नेमक्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे व कोणत्या वस्तूंवर बंदी नाही या बाबत वेगवेगळी माहिती येण्यासह सोशल मीडियावरही बंदीबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये छापील पिशव्यांवर बंदी आहे की नाही अशा बारीक सारीक गोष्टींपासून खाद्य पदार्थांच्या कोणत्या आवरणावर बंदी आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने या बाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
विक्री पूर्णपणे बंद
जळगावात जवळपास २२ प्लॅस्टिक वस्तू विक्री करणारे व्यापारी आहे. त्यांनी शनिवारपासून बंदी असलेल्या ज्या ज्या वस्तू माध्यमांमार्फत समजल्या त्या विक्री करणे बंद केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच परिपत्रक काढल्याने व्यापाºयांनी माल घेणे बंद केले होते व शिल्लक माल विक्री करीत होते. असे असले तरी अनेकांकडे अद्यापही माल शिल्लक असून त्याची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्राहकांच्या हाती दिसू लागल्या कापडी पिशव्या
प्लॅस्टिक बंदीमुळे नागरिकही जागृत झाले असून बाजारात प्लॅस्टिक पिशवी मिळणार नसल्याचा अंदाज घेत ग्राहक शनिवारी हाती कापडी पिशवी घेऊनच बाजारात आल्याचे चित्र दिसून आले. बंदी लागू झाल्याने कोणतीही वस्तू घेताना विक्रेते प्लॅस्टिक पिशव्या देणार नाही, असा विचार करीत नागरिकच बाहेर पडताना हाती पिशवी घेऊन निघाले होते. बाजारपेठेत विविध वस्तू घेतल्यानंतर अनेकांनी प्लॅस्टिक पिशवीची मागणीही केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये या बंदीबाबत जागृती असल्याचे काही व्यापाºयांनी सांगितले.
अनेकांची तारांबळ
बहुतांश जणांनी कापडी पिशव्या सोबत नेल्या तरी बरेच जण पिशवी घेऊन आले नव्हते. त्यामुळे फळ, भाजीपाला घेतल्यानंतर विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशवी देण्यास नकार दिल्याने ग्राहकांनी ते हातरुमाल अथवा दुचाकीच्या डिक्कीत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांचे यात नुकसानही झाले.
प्लॅस्टिक बंदीचे स्वागत आहे मात्र बंदीबाबत वेगवेगळी माहिती पसरत असल्याने त्याबाबत सरकारने स्पष्ट खुलासा करून कोणत्या वस्तूंवर बंदी आहे व कोणत्या नाही हे जाहीर केल्यास व्यापाºयांना मदत होईल.
- ललित बरडिया, सचिव, जिल्हा व्यापारीमहामंडळ.