जळगाव येथे चोरीचे वाहन खरेदी-विक्रीचे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:50 PM2018-03-09T12:50:13+5:302018-03-09T12:50:13+5:30
धक्कादायक
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - चोरलेल्या दुचाकी, कार व ट्रकची खरेदी व विक्री करण्यापासून तर त्याची विल्हेवाट लावणारे रॅकेट जळगाव शहरात सक्रीय असून त्याची पाळेमुळे धुळे, मालेगाव, भिवंडी व औरंगाबादपर्यंत पोहचले आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सादीक खान समशेर खान (वय ५०, मास्टर कॉलनी, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहर व जिल्ह्यातून शंभराच्यावर दुचाकी चोरणाºया अमोल बेलप्पा आखाडे उर्फ अर्जुनकुमार बेलप्पा वाणी (वय ३२ रा.वालसांगवी, ता.भोकरदन, जि.जालना ह.मु.नशिराबाद) याची गुन्हेगारी पार्श्वभूमी थक्क करणारी आहे. अगदी कमी वयात सायकल चोरीपासून तो गुन्हेगारीकडे वळला. त्यानंतर लूना या दुचाकीची चोरी करायला लागला. वाहने चोरुन पकडले जात नसल्याने त्याची हिंमत अधिकच बळावली. त्यामुळे नव्या दुचाकी चोरण्याचा उद्योग त्याने सुरु केला.
अमोल याचे चोरीचे उद्योग वाढल्याने सातत्याने पोलीस त्याला अटक करुन घेऊन जात होते. त्यामुळे त्याच्या वडीलांनी मुळ गाव सोडले. नशिराबाद येथे त्यांनी नवीन संसार सुरु केला. तेथेही तो जात असल्याने वडीलांनी त्याला हाकलून लावले होते. दरम्यान, उच्चभ्रु राहणीमान असल्याने त्याच्याकडे कोणीही संशयाच्या नजरेने पाहत नाही.
अमोल हा दुचाकी चोरताना शहरातील सात ते आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला आहे. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी त्याच्या शोधासाठी खास पथक तयार केले होते. अडीच महिने मेहनत घेतल्यानंतर जाळ्यात अडकला.
खिशात २४ तास पावती
नवी दुचाकी चोरल्यानंतर ती अवघ्या १० ते १५ हजारात विक्री होत असे. फायनान्सचे हप्ते थकल्याने दुचाकी जमा केल्याचे सांगून अमोल बेलप्पा हा लोकांची दिशाभूल करीत होता. वाहन विक्रीसाठीचे त्याने खास पावती बनविली होती. ही पावती २४ तास त्याच्या खिशात असते. पोलिसांनी ही या पावत्या जप्त केल्या आहेत. दरम्यान, बाहेर समाधानकारक ग्राहक मिळाले नाही तर भंगारात फक्त ५ हजारात दुचाकी विक्री केली जात होती. भंगारात दुचाकी जाताच अवघ्या दहा मिनिटात त्याचे स्पेअर पार्ट मोकळे होतात.