ग्राहक आणि विक्रेत्याने जाणले कापडी पिशव्यांचे मोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:21 PM2018-08-03T18:21:30+5:302018-08-03T18:21:57+5:30
चाळीसगावात युगंधरा फाउंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वितरण
चाळीसगाव, जि.जळगाव : युगंधरा फाउंडेशनच्या वतीने प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेंतर्गत कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात ग्राहकासोबतच विक्रेत्यांनीही कापडी पिशव्यांचे मोल जाणल्याचे दिसून आले.
याप्रसंगी ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी प्लॅस्टिक बंदीसंदर्भात महत्त्व पटवून देत कापडी पिशवी वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी मनोगतातून प्लॅस्टिक विघटन आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले, तर ‘प्लॅस्टीक प्रतिबंधात्मक जनजागृती करुया’,‘चला तर मग आजपासून कापडी पिशवी वापरुया’ याविषयी शपथ घेण्यात आली.
युगंधरा फाउंडेशनच्या वतीने बस स्टँड परिसर, गणेश कॉम्प्लेक्स आवार, बाजार हाट, छोटी गुजरी, पोलीस वसाहत आदी भागात सुमारे ३०० ते ३५० कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ग्राहक आणि विक्रेत्यांना कापडी पिशवीचे मोल पटवून देण्यात आले.
छोट्या-छोट्या कृतीतून पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. ग्रामीण व शहरी भागात बंदीत समाविष्ट असलेल्या प्लॅस्टीकच्या साधनांचा सर्रासपणे वापर होत होतांना दिसून येत आहे मात्र प्लॅस्टीक बंदीबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती होत नसल्याने प्लॅस्टिक बंदीची घोषणा होऊनही त्याची कृतीशील अंमलबजावणी होताना नागरिक दिसत नाही. तसेच आगामी गणेशोत्सवात प्रत्येक महिलेने घरगुती फुलांची आरास करून कागदी सुशोभिकरणाचे देखावे करावे. जेणेकरुन प्लॅस्टिकचा वापर होणार नाही. तसेच घरातील विनावापरातील साड्या आणि ड्रेसच्या कापडी पिशव्या म्हणून उपयोगात आणाव्यात, असे ग्रीन मिशन फाउंडेशनच्या अध्यक्षा उमा चव्हाण यांनी सांगितले.
जलद विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जीवितासदेखील धोका निर्माण होत आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे डॉ.उज्ज्वला देवरे यांनी सांगितले.
पर्यावरणास अपायकारक ठरणाºया प्लॅस्टिकच्या वस्तुंवरील बंदी जाहीर झाली असली तरी सुजाण नागरिक व पर्यावरणप्रेमी म्हणून प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरीता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे याची सुरुवात स्वत:पासून केल्यास अभियानाचे फलित होणार आहे, असे युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी नमूद केले.
यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा लता जाधव, सचिव राखी संगेले, संगीता सूर्यवंशी, मोनाली भोई, वंदना पाटील, रुपाली चव्हाण, मनीषा पवार, वंदना सूर्यवंशी, कविता शिंदे, वंदना चव्हाण, सुरेखा नाईक, अनिता रोकडे, प्राजक्ता पाटील, जयश्री जगताप, सारा पाटील, साधना पाटील आदी महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवित कापडी पिशवी वापरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.
सूत्रसंचालन छाया पाटील यांनी, तर आभार राखी संगेले यांनी मानले, अभियान यशस्वीतेसाठी स्वप्नील कोतकर, नितीन वाल्हे यांचे सहकार्य लाभले.