स्ट्रेन कोरोनाचे रुग्ण आल्यास सी-१ कक्ष राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:00+5:302021-01-01T04:12:00+5:30
जळगाव : विदेशातून आलेले प्रवासी आणि स्ट्रेन कोरोनाचे संशयित रुग्ण समोर आल्यास काय नियोजन करावे, याबाबत गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयात ...
जळगाव : विदेशातून आलेले प्रवासी आणि स्ट्रेन कोरोनाचे संशयित रुग्ण समोर आल्यास काय नियोजन करावे, याबाबत गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयात प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या नव्या स्ट्रेन कोराेनाचे रुग्ण आल्यास त्यांच्यासाठी सी १ कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता ही बैठक घेण्यात आली. विदेशातून आलेला अद्याप एकही रुग्ण संशियत म्हणून रुग्णालयात दाखल झालेला नाही. मात्र, विदेशात या नव्या कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, विदेशातून जळगावात आलेले असे रुग्ण समोर आल्यास सी-१ कक्षातच दोन स्वतंत्र भाग करून त्यात संशयित आणि बाधित रुग्ण ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, या बाधित आणि संशयित रुग्णांना नियमित कोरोना रुग्णांबरोबर नव्हे तर स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात येणार असून त्यासाठीच सी-१ कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे. या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना अधिष्ठाता डॉ. पोटे यांनी दिल्या आहेत. या रुग्णांवर पूर्वीप्रमाणे औषधोपचार करण्याच्या आयसीएमआरच्या सूचना असून त्यानुसार हे औषधोपचार करावेत, अशाही सूचना देण्यात आल्या. बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले आदी उपस्थित होते.
स्वतंत्र दाखल करणार
विदेशातून आलेल्या रुग्णांना काही लक्षणे जाणवू लागल्यास त्यांना रुग्णालयात संशियत म्हणून स्वतंत्र दाखल करून बाधित रुग्णांचा एक नमुना हा पुणे एनआयव्ही येथे पाठविण्यात यावा आणि यासाठीचे नियोजन औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुखांनी करावे, असेही या वेळी सांगण्यात आले.