जळगाव : टीईटी परीक्षार्थींसाठी पुकारा, प्रमाणपत्रासाठी हजर व्हावे लागणार...!
By अमित महाबळ | Published: April 4, 2023 06:47 PM2023-04-04T18:47:07+5:302023-04-04T18:52:08+5:30
शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
जळगाव - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२१ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार असून, त्यासाठी बुधवार (दि. ५) पासून जि. प. विद्यानिकेतन येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
संबंधित उमेदवारांचे शैक्षणिक, व्यावसायिक, जात वैधता प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र तपासून उमेदवार कागदपत्रानुसार पात्र ठरत असेल, तर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून देण्यात आले आहेत. शिबिर दि. ५ ते दि. २३ एप्रिलदरम्यान होणार असून, केवळ रविवारी कामकाज बंद राहणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.
ही कागदपत्रे सोबत आणा...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, डीटीएड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास पुरावा, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, निवडणूक ओळखपत्र आदी.)
प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास...
पात्र परीक्षार्थींना प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार करावी. अर्जासोबत पुरावादर्शक गुणपत्रक, प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडावीत, असे कळविण्यात आले आहे.