कैद्याच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थित इनकॅमेरा शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:54 PM2021-01-06T15:54:31+5:302021-01-06T15:55:22+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रघुनाथ इंगळे याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या रघुनाथ लोटू इंगळे (५९,रा. महावीर चौक, सावदा) याचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात बुधवारी न्यायाधीश जी.जी.कांबळे यांच्या उपस्थित इनकॅमेरा करण्यात आले. न्यायाधीशांनी ३० मिनिटे मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रघुनाथ इंगळे याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्याला १ जानेवारी रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. मणक्याच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केलेला आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूविषयी नातेवाईकांनी कोणताही आक्षेप किंवा तक्रार केलेली नाही. न्यायालयीन बंद्याचा मृत्यू झाल्यास कायद्यानुसार त्याचे न्यायाधीशांच्या उपस्थित इनकॅमेरा शवविच्छेदन होते व तक्रार असल्यास सीआयडीमार्फत चौकशी केली जाते.
दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर इंगळे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, प्रवीण भोसले, प्रमोद महाजन, कारागृहाचे अधिकारी जितेंद्र माळी व इतर कर्मचारी उपस्थित होते.