जळगावातील समांतर रस्त्यासाठी १०० कोटी मिळणे अशक्य, एकनाथ खडसे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:44 PM2018-02-10T12:44:48+5:302018-02-10T12:52:38+5:30
महामार्ग मनपाकडे असल्याने महामार्ग प्राधीकरणाकडून निधी कसा मिळणार ?
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १० - शहर व जिल्हावासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या समांतर रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले असले तरी महामार्ग जळगाव महापालिकेच्या ताब्यात असल्याने त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून निधी मिळणे शक्य नसल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी केला. या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने निधी मिळण्यास अडचण येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी संध्याकाळी पत्रपरिषद झाली, त्या वेळी बोलताना त्यांनी हा दावा केला.
माहिती नसल्याने १०० कोटी मंजूर
समांतर रस्त्याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, २०१२मध्येच हा महामार्ग जळगाव महापालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी देण्यात आला असून तसे मनपाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र करून दिले आहे. या बाबत गडकरी यांना माहिती नसल्याने निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र महामार्गाची जबाबदारी मनपाकडे असल्याचे लक्षात आल्याने महामार्ग प्राधीकरण निधी मंजूर करू शकत नाही, असा खडसे यांनी स्पष्ट केले.
प्रतिज्ञापत्र रद्द करावे लागणार
महामार्गाबाबत मनपाने न्यायालयात केलेले प्रतिज्ञापत्र रद्द करीत नाही व त्याची मालकी जो पर्यंत प्राधीकरणाकडे येत नाही तो पर्यंत १०० कोटी मिळणे अवघड असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
आश्वासनाचा जिल्हाधिका-यांनी पाठपुरावा करावा
समांतर रस्त्यासाठी गेल्या महिन्यात समांतर रस्ते कृती समितीने आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी १०० कोटीचा निधी मिळाल्याचे सांगून त्यातून एप्रिल महीन्यापर्यंत समांतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते.या बाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, लेखी आश्वासनाची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची आहे, त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा, असे स्पष्ट केले.
तरसोद ते चिखली चौपदरीकरणाचे तिसºया ठेकेदारानेही काम सोडले
समांतर रस्त्यासोबतच महामार्ग चौपदरीकरणाचाही विषय महत्त्वाचा असला तरी तरसोद ते चिखली दरम्यानच्या कामास सुरुवात होत नसल्याबद्दल खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या कामास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. या पूर्वी दोन ठेकेदार बदलले, आता तिसºयानेही काम सोडले असल्याचा दावा खडसे यांनी केला.
शनिवारी मोठा गौप्यस्फोट?
पत्रकारांशी संवाद साधताना शेवटी खडसे म्हणाले की, शनिवारी आणखी मोठी बातमी देणार आहे. यामुळे एकनाथराव खडसे आणखी काय गौप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पर्याय असतोच, मात्र थोड्याकाळासाठी नुकसान होतेच
खान्देशात आपणास पर्याय नाही, असे विचारले असता खडसे म्हणाले, पर्याय असतोच पंडित नेहरु यांच्यानंतर इंदिराजी चांगल्या पंतप्रधान झाल्या, त्यानंतर अटलजी व आता मोदीजी चांगले पंतप्रधान आहे. पर्याय नसतो, असे नाही मात्र केवळ थोड्याकाळीसाठी नुकसान होते, असेही स्पष्ट केले. खान्देशात अनेकांना भाजपात आणले व १९८९पासून दोन वेळचा अपवाद वगळता सातत्याने भाजपाचे खासदार निवडून आले असल्याचे सांगून त्यांनी उत्तर महाराष्ट्र भाजपाचे बलस्थान असल्याचे नमूद केले.
रेशन गोदाम अनियमितता प्रकरणी निलंबनाचे आदेश
भुसावळ येथील रेशन गोदाम तसेच जिल्ह्यातील तपासणीच्या अहवालाबाबत विचारले असता अहवालात आलबेल असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. कारण यामध्ये तपासणी दरम्यान संबंधितांना आठ दिवसांची संधी मिळाली. या बाबत अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी आज बोललो असता काहींच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये गोडाऊन किपर व अव्वल कारकून यांचा प्रथम समावेश असून इतरांचेही निलंबन होईल, असा दावा त्यांनी केला.
रोज बातम्या येतील इतक्या मंजुरी आणल्या
बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून त्यास निधी मंजूर केला असल्याचे खडसे म्हणाले. यासोबत ४० कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला असून रोज बातम्या येतील इतका निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचे मूल्यमापन तुम्ही करा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे धावती भेट देतात, याबाबत विचारले असता खडसे म्हणाले, या बाबत मी कॉमेण्ट करीत नाही, याचे मूल्यमापन तुम्हीच करा, असे स्पष्ट केले.