मनपा फंडातील त्या ७० कोटींच्या कामांना बसू शकतो ब्रेक ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:35+5:302021-03-24T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर वाढत जाणारी नाराजी पाहता फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत भाजपने शहरातील विविध भागांत मनपा फंडातून ७० कोटींच्या निधीतून रस्ते करण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. यासाठी एका मक्तेदाराने हे काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, मनपातील सत्ता आता शिवसेनेकडे गेल्याने ही कामे होण्याची शक्यता कमी झाली आहे.
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर सर्वदूर ओरड सुरू झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी एका खासगी मक्तेदारांकडून शहरातील रस्ते मनपा फंडातून करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्यानुसार महासभेत ७० कोटींच्या निधीतून शहरातील रस्ते तयार करण्याचा ठराव तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करून घेतला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यामुळे व हे काम करण्यासाठी मक्तेदार तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणला होता. त्यामुळे हे काम संबंधित मक्तेदाराकडून आताही करून घेतले जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा शहरातील रस्त्यांच्या कामांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्या ४२ कोटींच्या निधीतून केवळ रस्त्यांच्या कामांना दिले जाणार प्राधान्य
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली होती. अद्यापही या निधीवरील स्थगिती उठवण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिकेत आता शिवसेनेची सत्ता आल्याने त्यातच राज्यातदेखील शिवसेनेची सत्ता असल्याने, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी नगर विकासमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. दरम्यान, ४२ कोटींच्या निधीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केवळ १६ कोटी रुपयांच्या कामांचे रस्त्यांचे नियोजन केले होते. शहरातील रस्त्यांचा बिकट प्रश्न पाहता या ४२ कोटींच्या कामांच्या निधीत सर्व कामे ही रस्त्यातच केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
शहरातील नवीन रस्ते आता दिवाळीनंतरच
शहरात सुरू असलेली अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, शहरातील रस्त्यांचा प्रश्न सुटण्यासाठी अजूनही जळगावकरांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी महापालिका प्रशासनाकडे कोणताही निधी शिल्लक नसल्याने, त्यातच शासनाकडून मिळालेल्या निधीवरदेखील स्थगिती असल्याने येत्या दोन महिन्यांत तरी नवीन रस्ते होऊ शकत नाहीत. त्यातच जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांचे कोणतेही नवीन काम घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण झाले तरी शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांना आता दिवाळीनंतरच सुरुवात होईल, अशी शक्यता मनपातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.