चोपडा येथे लाच स्वीकारताना कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:39 AM2019-09-21T00:39:43+5:302019-09-21T00:42:05+5:30
लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.
चोपडा, जि.जळगाव : येथील पाटबंधारे उपविभाग कार्यालयातून लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना जळगाव येथील एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचारला चोपडा हातनूर कार्यालयाच्या आवारातच रंगेहात अटक केली. या कारवाईने पाटबंधारे विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
चोपडा तालुक्यातील ७० वर्षीय तक्रारदार व त्यांच्या भाऊबंदकीच्या नावे असलेली वडिलोपार्जित शेतीची खाते फोड करण्यासाठी त्यांना लाभ क्षेत्राबाबत तसा दाखला हवा होता. त्यांनी चोपडा कार्यालयात शुक्रवारी संपर्क साधल्यानंतर संशयित आरोपी कालवा निरीक्षक विजय पाटील यांनी ४०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवलेली होती. लाचेची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, कॉन्स्टेबल पाटील, नासिर, देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने आरोपीला लाच घेताना रंगेहात पकडले. चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे.