कालवे व पाटचाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:46 PM2019-12-01T21:46:30+5:302019-12-01T21:46:34+5:30
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी : जामदा उजवा-डावा कालवा व पाटचारीची दुरवस्था
भडगाव : गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढली असून सफाई करण्यात यावी. यासह काही ठिकाणी दुरुस्ती व पाटचाऱ्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांच्या आवर्तनानुसार पाण्याचा लाभ मिळण गरजेचे आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाने तात्काळ या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
यावर्षी सर्वत्र धो धो पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक वर्षांतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. नाशिक जिल्हयातील गिरणा धरणावर गिरणा नदीतील पाण्याची आवक अवलंबून आहे. मात्र यावर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने गिरणा काठावरील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन गिरणा नदीला सुरुच असल्याने गिरणामाय खळखळून वाहत आहे. त्यात आता रब्बी हंगामासाठीही गिरणा नदीला व गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. कालव्यांना सुरुवातीस २ पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहीती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी गिरणा जामदा उजवा व डावा कालव्यालगत दुतर्फा गवत, झडपांसह घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे कालवे अस्वच्छ बनले आहेत. दोघा कालव्यांना काही ठिकाणी व मुख्य पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. आता रब्बी हंगामाला कालव्यांतून पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने तत्काळ गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याची दुतर्फा साफसफाई करावी. तसेच काही ठिकाणी कालव्याच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.