तक्रार निवारण समितीवरील चेअरमन यांची नेमणूक रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:33+5:302021-06-04T04:14:33+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी एनमुक्टो संघटनेच्या वतीने प्रभारी कुलगुरुंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तक्रार निवारण समितीचे चेअरमन हे विद्यापीठ कायद्यानुसार निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असावेत. पण, विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीच्या चेअरमन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत. त्या जिल्हा न्यायाधीश नसल्यामुळे त्यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच नेमणूक रद्द न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर समितीत अधिष्ठाता पी.पी. छाजेड यांचा समावेश आहे. मात्र, ते नियमित निवड झालेले अधिष्ठाता नसल्यामुळे त्यांचीदेखील नेमणूक रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
==
सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत पाच जणांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नव्या मॉडेलसाठी अर्थात संगणकीय प्रक्रियेसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून ते तात्काळ राज्य शासनाकडे पाठवावे लागणार आहे. शिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी महाआयटी, सी-डॅक, एनआयसी यांची मदत घेतली जाईल. सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्याची यशस्वीपणे चाचणी केल्यानंतरच प्रत्यक्ष वापर केला जाईल. यासाठी सदर समितीला महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. नव्या मॉडेलमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, ३० जूनपर्यंत शिक्षक बदलीप्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे.