सागरपार्कवर जाॅगिंग ट्रॅक चे काम रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:51+5:302020-12-09T04:12:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -शहरात युवकांना खेळण्यासाठी सागरपार्क ऐकमेव मैदान आहे. या मैदानाचा विकास झाला असून, भोवती वॉल कंपाऊंड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -शहरात युवकांना खेळण्यासाठी सागरपार्क ऐकमेव मैदान आहे. या मैदानाचा विकास झाला असून, भोवती वॉल कंपाऊंड तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकचे काम केल्यास याठिकाणी खेळणाऱ्या युवकांना त्रास होणार आहे. यामुळे या मैदानावर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येवू नये अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. मंगळवारी विविध प्रश्नांवर आमदार भोळे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील,गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपाचे विधी तज्ज्ञ अॅड.आनंद मुजूमदार, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. सागरपार्क चा विषयावर आता शिवसेना व भाजप आमने-सामने आले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी सागरपार्क वर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येवू नये अशी भूमिका घेतली आहे. तर शिवसेना नगरसेवकांनी याठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे. त्यावर मंगळवारी आमदारांनी थेट मनपा आयुक्तांची भेट घेवून हा ट्रॅक तयार न करण्याचा सूचना दिल्या आहेत. यामुळे या विषयावर सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गाळेप्रश्नी तोडगा काढा
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून, ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली आहे. अशा गाळेधारकांना गाळे नुतनीकरण करून देण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव महासभेत प्रशासनाने मांडावा अशा सूचनाही आमदार भोळे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच ५ पट दंडबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.