रक्षा खडसेंविरुद्धचा उमेदवार दोन दिवसांत ठरेल, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 03:13 PM2019-03-25T15:13:30+5:302019-03-25T15:14:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचा संयुक्त मेळावा सोमवारी सकाळी जळगावातील केमीस्ट भवानात झाला
जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघाची जागा आघाडीतील कुठल्या पक्षाकडे द्यायची याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी दुपारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महायुती आणि महाआघाडीतील लोकसभा निवडणुकांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. पण, आघाडीकडून अद्याप रावेर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचा संयुक्त मेळावा सोमवारी सकाळी जळगावातील केमीस्ट भवानात झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत स्पष्टीकरण दिले. या मेळाव्यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांची माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि रावेरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी विनंती केली. त्यावर, पक्षाच्या कोअर कमेटीत निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितल्याची माहिती मिळाली. कारण, लोकसभेसाठी जवळपास सर्वच जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. मात्र, अद्यापही रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला हा पेच सुटला नाही. त्यामुळे रावेर मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसेंविरुद्ध कोण ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना, दोन दिवसात याबाबतच निर्णय होईल, असे जयंत पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना सांगितले.