उमेदवारांकडून मतदारांना खुलेआम पैसेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:57 PM2018-08-01T15:57:55+5:302018-08-01T16:22:03+5:30
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर
ठळक मुद्देनिवडणूक व पोलीस यंत्रणेकडून सोयीस्कर कानाडोळा ‘सेंट लॉरेन्स’मधील यंत्र बदललेच नाहीत मंगळवारपर्यंत गुपचूप; बुधवारी खुलेआम पैशांचे वाटप
जळगाव
: मनपा निवडणुकीत जामनेरप्रमाणे चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळेच निवडणुकीवर देखरेखीसाठी असलेली यंत्रणा व पोलीस यंत्रणेने गैरप्रकारांकडे सोयीस्कर कानाडोळा केला. त्याचा गैरफायदा घेत उघडपणे मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले.‘सेंट लॉरेन्स’मधील यंत्र बदललेच नाहीत
मंगळवार, ३१ जुलै रोजी रात्री सेंट लॉरेन्स स्कूलमधील मतदान केंद्रातील मतदान कर्मचाºयांसाठी जेवण घेऊन भाजपा उमेदवाराची गाडी थेट मतदान केंद्राच्या आवारात शिरल्याचा प्रकार उघडकीस आला. याचवेळी एका कर्मचाºयाजवळ मतदान यंत्र उघडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विरोधकांनी या मतदान केंद्रावरील कर्मचारी बदलण्यासोबतच मतदान यंत्रही बदलण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक यंत्रणेने केवळ कर्मचारी बदल करून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक निवडणूक करण्याची भाषा करणाºया निवडणूक यंत्रणेने मतदान यंत्र कोणाच्या दबावाखाली बदलले नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
मंगळवारपर्यंत गुपचूप; बुधवारी खुलेआम पैशांचे वाटप
गेले दोन दिवस उमेदवारांकडून गुपचूप पैसे वाटप सुरू असल्याची चर्चा होती. तशा तक्रारीही आचारसंहिता कक्षाकडे येत होत्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगितले जात होते. मात्र मतदानाच्या दिवशी दुपारी अडीच-तीन वाजेपासून खुलेआम पैशांचे वाटप सुरू झाले. यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर होते. विरोधी उमेदवारांकडून तक्रार करूनही निवडणूक यंत्रणा व पोलिसांकडून केवळ तपासणीचा देखावा केला जात होता. उमेदवारांनी जेवढे प्रकार उघडकीस आणले तेवढेच पुढे आले. निवडणूक यंत्रणेने अथवा पोलिसांच्या पथकांनी स्वत:हून एकही कारवाई केल्याचे आढळून आले नाही. यावरून ही यंत्रणा राज्यातील सत्ताधाºयांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष
सेंट लॉरेन्स शाळेच्या मतदान केंद्र परिसरातच पैसे वाटपाचा प्रकार सुरू असल्याचे व्हीडीओ काढून एकाने पोलिसांना दाखवून दखल घेण्याची मागणी केली. मात्र पोलिसाने दुर्लक्ष करून संबंधीत तरूणाला टोलविले.
भर रस्त्यावर नोटांचे बंडल वाटले
पैसे वाटपासाठी विश्वासू कार्यकर्त्यांना भर रस्त्यावर पैशांचे बंडल देऊन जबाबदारी सोपविण्याचा प्रकार वाघनगर रस्त्यावर घडला. एक उमेदवार भर रस्त्यावर समर्थकांसह उभा राहिला. तेथेच विश्वासू कार्यकर्त्याकडे असलेल्या बॅगमधून वाटपासाठी १००-५०० च्या नोटांचे बंडल काढून उमेदवाराने त्याच प्रभागात सोबत निवडणूक लढणाºया अन्य उमेदवाराच्या ताब्यात दिले. तर दोन बंडल अन्य विश्वासू कार्यकर्त्यांजवळ वाटपासाठी दिले. त्याचवेळी विरोधकांचे वाहन तेथे पोहाचताच कार्यकर्ते सटकण्याच्या तयारीत होते. मात्र उमेदवाराने घाबरू नका, उभे रहा असे सांगितल्याने ते जागेवरच थांबले. विरोधकांची गाडी तेथून निघून जाताच समोरून पोलिसांच्या दोन-तीन गाड्यात विरूद्ध दिशेने तेथे पोहोचल्या. त्यांनीही उमेदवाराशी गप्पा मारून पुढे प्रस्थान केले.
घरांमधून पैसे वाटप
म्युन्सीपल कॉलनी परिसरात व प्रभात चौक परिसरातूनही घरांमधून, कार्यालयांमधून पैशांचे वाटप सुरू होते. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मतदारांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. पैसे दिल्यानंतर मतदान केंद्रापर्यंत मतदारांना घेऊन जाण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केलेली असल्याचे दिसून आले.