चित्ररूपी 'गांधीतीर्थ'ची कॅनडावारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:15 AM2019-12-25T02:15:56+5:302019-12-25T02:16:17+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत कलाप्रेमी आरीफ आसीफ शेख...
केवळ ब्रश घेऊन रंगसंगती करत चित्र साकार होत नसते, तर मनात तयार होणाऱ्या प्रतिमांना चित्ररूप देताना, सभोवतालची सृष्टी पाहताना, निसर्गाने बहाल केलेल्या विविध रंगछटा कागदावर चितारून सुबक चित्र चित्रकार साकार करत असतो. जळगावचेकलाकार आनंद पाटील यांनी उत्कृष्ट असे महात्मा गांधीजींच्या विचारांशी जवळीक निर्माण करणारे ‘गांधीतीर्थ’ जलरंगातून चित्ररूपात व्यक्त केले आहे. प्रदर्शनाकरिता गांधीजींचा विषय मुद्दामहून निवडला. आजच्या फोर-जी, फाइव-जी युगातही गांधीजींविषयीची आत्मीयता आहे आणि गांधीजींना समजण्यासाठी गांधीतीर्थ साकार करण्यात आले आहे. मुंबई नगरीच्या धरतीवर गांधीतीर्थ चितारून या प्रदर्शनाच्या माध्यमातून सेकंदागणिक जलदरितीने आगेकूच करणाºया मुंबईकरांना गांधीतीर्थाची ओळख व्हावी हा या मागचा हेतू होता.
‘गांधीतीर्थ’ नेमके काय आहे याची यथार्थ अनुभूति देण्यासाठी त्यांचे चित्रप्रदर्शन नुकतेच मुंबईतील आर्ट प्लाझा गॅलरीत पार पडले. कॅनडामधील माँट्रियाल शहराच्या निवासी पूजा साई यांनी या प्रदर्शनाला भेट दिली व त्यातील निवडक चित्रे विकत घेतली. अशा तºहेने जळगावचे 'गांधीतीर्थ' चित्ररूपाने कॅनडात पोहोचले, हा एकप्रकारे कलेचा सन्मानच म्हणावा लागेल.
भवरलालजी जैन यांचे मित्र परिवारातील सदस्य व ज्येष्ठ जाहिरात तज्ज्ञ आनंद गुप्ते आणि मुंबई येथील सर जे.जे.कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता जॉन ड्गल्स यांच्याहस्ते उद्घाटन झाले. एकूण १८ चित्रे या प्रदर्शनस्थळी लावण्यात आली होती. जळगाव येथील जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरातील 'गांधीतीर्थ' म्युझियम हे गांधी-विचार प्रचार-प्रसाराचे केंद्र आहे. पर्यावरण संरक्षण अहिंसा, शांती, प्रेम यासोबत वैश्विक समाज निर्मिती व्हावी यासाठी तरूणांमध्ये गांधी विचारांचे संस्कार, आचरण व्हावे, यासाठी 'गांधीतीर्थ' विविध उपक्रम राबवीत असते.
गांधी विचारांनी प्रेरित होऊन चित्रकार आनंद पाटील यांनी ही चित्रे साकारली आहेत. चित्रातून गांधीतीर्थ अनुभवता यावे यासाठी गांधीतीर्थच्या विविध भागांत स्वत: बसून त्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. गेल्या २१ वर्षांपासून आनंद पाटील कलाक्षेत्रात कार्यरत असून, विविध विषयांवर संवेदनात्मक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. चित्रे व पोस्टर प्रदर्शनाद्वारे जलबचतीचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. जलजागृती संदर्भात त्यांचे अभियान जळगाव शहरातील शाळांमध्ये सुरू आहे. पाच ग्रुप, चार सोलो प्रदर्शन यासह त्यांची ७५च्या वर पेटिंग संग्रहीत झाली आहेत. आर्ट-प्लाझा येथील चित्रप्रदर्शनाला अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि जवळपास १२०० कलारसिकांनी देऊन गांधीतीर्थ समजून घेतले व आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे, वि. दे. सलामे, नरेंद्र विचारे, आर्ट प्लाझाचे चेअरमन अमन ए., सोमाणी कुमकुम आदींनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले.
जळगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'गांधीतीर्थ'ची साक्षात अनुभूति आनंद पाटील यांनी मुंबईकरांना या चित्रांच्या माध्यमातून घडविली. आठवडाभर चाललेल्या या प्रदर्शनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या दरम्यान मुंबईला आलेल्या व हल्ली माँट्रियाल, कॅनडा येथे वास्तव्यास असलेल्या पूजा साई यांनी प्रदर्शनातील निवडक चित्रे खरीदणे हे गांधीजींच्या विचारांचा देश विदेशात अजूनही पगडा असल्याचे द्योतक आहे. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यातून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त केली होती. आजही त्यांचे विचार सर्वत्र आत्मसात केले जातात. माँट्रियाल हे कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोराँटोखालोखाल दुसºया क्रमांकाचे शहर आहे.
हे प्रदर्शन मुंबईच्या कालाघोडा भागातील ‘आर्ट प्लाझा’ गॅलरीत आठवडाभर चालले. कलादालनात प्रवेश करताच या प्रदर्शनातील चित्रे लक्ष वेधून घेत अनेकांची उत्सुकता वाढवत असत. त्याचा अर्थबोध प्रदर्शन पाहताना हळूहळू होत जायचा. ‘सामान्यांमध्ये असलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून असामान्य कार्य घडविणे’ हा जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचा अलौकिक गुण अध्यक्ष अशोक जैन यांच्यातही पुरेपूर उतरला आहे. हा संस्कार जपत साहित्य, कला क्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून ते जिल्ह्याचं आणि पयार्याने देशाचं नाव उंचावतील, या विचारातून अशोक जैन हे नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. जैन इरिगेशनमध्ये कार्यरत चित्रकार आनंद पाटील यांच्या प्रदर्शनाबद्दलच्या संकल्पनेस पाठिंबा देऊन, आवश्यक तेवढ्या सगळ्या बाबींची पूर्तता त्यांनी करून दिली व सदरील प्रदर्शन पार पडले.
दैनंदिन कामे करून कलाकृती साकारण्याकरिता सवड काढणे अगत्याचे होते. आनंद पाटील यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त वेळ देऊन या प्रदर्शनासाठी मेहनत घेतली. ही खरे तर तारेवरची कसरतच असली तरीही त्या ताणतणावातून स्वत:ला सावरत, आपली सारी कामे आवरत चित्रनिर्मितीला पूर्णरूप देण्यासाठी कार्यमग्न राहणे हे अत्यंत आनंददायक असते.
सामान्य माणसाच्या आयुष्यात कधीच कुणाला वेळ पुरून उरत नसतो. प्रत्येकाला अनेक व्याप असतात. पण चित्र काढणे ही व्यावसायिकता नसते, त्यातून अर्थबोध आणि संदेश दिलेला असतो. सांगायचं तात्पर्य एवढेच की चित्र आणि त्याची शैली ही चित्रकाराची अभिव्यक्ति असते. 'गांधीतीर्थ' आणि येथील आल्हाददायक वातावरण एक नजर फिरवल्यास मनशिंपल्यात विसावते.
-आरीफ आसीफ शेख, जळगाव