भगवान श्रीकृष्णाचा बंदीवास अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:35 PM2020-08-11T12:35:23+5:302020-08-11T12:35:39+5:30
आज श्रीकृष्ण जयंती : मूर्ती कॉपीराइट प्रकरणात अडकली
जळगाव : भगवान श्रीकृष्णाचा जन्म बंदीवासात झाला होता. वासुदेवाने त्यांना बंदीवासातून बाहेर नेले. मात्र १६ वर्षांपासून जळगावातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बंदीवासातच आहे. सन २००४ पासून हा बंदीवास सुरु आहे. इथे एक नाही तर चक्क दोन कुलूपे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी जळगाव जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे काम अतिशय जोमात होते. सर्व सूत्रे प्रा. सु.का. जोशी यांच्याकडे होती. परंतु मध्यंतरी स्वाध्याय परिवार आणि जोशी यांच्यात वाद झाला.
प्रा. जोशी यांनी जळगावातील नूतन मराठा कॉलेजशेजारील गल्लीत ज्ञानेश्वर मंदिराची उभारणी केली. या मंदिरात भगवान योगेश्वर श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती आमचाच ‘कॉपीराइट’ असल्याचा आक्षेप पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराकडून घेण्यात आला. इथूनच वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहचले.
वाद वाढल्याने न्यायालयाने ही मूर्ती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस ठाण्यात मूृर्ती आणण्यात आली. इथूनच या श्रीकृष्ण मूर्तीचा बंदीवास पुन्हा सुरु झाला. जवळपास दीड ते दोन वर्षे ही मूृर्ती पोलीस ठाण्यात होती.
यानंतर न्यायालयाने या मूर्तीची पोलीस ठाण्यातून सुटका केली आणि ज्ञानेश्वर मंदिरातच ही मूर्ती कुलूप बंद ठेवण्यात यावी असे आदेश दिले. शिवाय पूजा अर्चना करण्यास बंदी घातली. त्यानुसार मंदिरात मूर्ती आणण्यात आली. आता ती कुलूपबंद आहे. सध्या दोन कुुलुपे आहेत. एक मंदिराचे आणि दुसरे पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराने लावलेले. मंदिराच्या मागील बाजूस ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या वादाशी संबंधित प्रा.सु.का.जोशी, स्वाध्याय परिवाराचे भीष्मराज बाम यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यामुळे या वादाशी संबंधित हालचाली मंदावल्या आहेत.
कॉपीराइट नाही
ही मूर्ती म्हणजे आम्ही कॉपीराइट केलेली नाही. स्वाध्याय परिवाराकडील मूृर्ती ही योगेश्वराची आहे तर आमच्याकडील मूृर्ती ही योगेश्वर श्रीकृष्णाची असल्याचा दावा मंदिराशी संबंधित असलेले प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी केला आहे.
आमच्याकडील मूर्ती आणि स्वाध्याय परिवाराकडील मूर्ती यांच्यात ४२ ठिकाणी फरक आहे. स्वाध्याय परिवाराकडील मूृर्तीचा डावा पाय पुढे आहे तर आमच्याकडील मूर्तीचा उजवा पाय पुढे आहे.
- प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे