जळगावात वाळूच्या डंपरची कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:53 PM2018-07-24T12:53:03+5:302018-07-24T12:55:24+5:30
सुभाष चौक परिसरात तणाव
जळगाव : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याच्या कारणावरुन सुभाष चौक परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजता तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, वाळूचे हे डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धक्कादायक म्हणजे, सायंकाळी सहा वाजेनंतर वाळू वाहतुकीस बंदी असतानाही सर्रास वाहतूक सुरु असल्याने हा अपघात झाला. महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.
नागरिकांनी अडविला डंपर
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लोकेश गजानन मराठे (रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त शहरात आलेले होते. सुभाष चौक परिसरात राजकमल टॉकीज चौकाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी त्यांची कार (क्र.एम.एच.१९ सी. एफ.५००६) पार्कींग केलेली होती. रात्री ९ वाजता सुभाष चौकाकडून वाळूने भरलेला डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ४००९) याच रस्त्याने जात असताना कारला डंपरने धडक दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मराठे यांनी डंपरला अडविले. तेव्हा डंपर चालक अशोक जाधव व क्लिनर याने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रस्त्यावरील लोकांनीच डंपर चालकाला खाली उतरविले. काही मिनिटातच शंभराच्यावर जमाव जमला होता.
डंपर पहूर येथील
काही जणांनी डपरची तोडफोड करण्याची तयारी केली, तितक्यात शनी पेठ पोलीस स्टेशनचे गिरीश पाटील व रवींद्र पाटील तेथे पोहचले. त्यांनी गर्दीला पांगवून डंपर चालकाला ताब्यात घेऊन डंपर पोलीस ठाण्यात नेला. पहूर येथील गणेश सोनार यांच्या मालकीचा हा डंपर असल्याचे निष्पन्न झाले.
प्रशासनाचा आशीर्वाद
शहरातून अवजड वाहनांना बंदी असतानाही वाळूची वाहने प्रशासनाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे वापरत आहेत.गेल्या महिन्यात याच रस्त्यावर चौबे शाळेजवळ वाळूच्या डंपरने वृध्दाला उडविले होते.