शेत पहायला गेलेल्या तरुणांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू, दुसरा जखमी
By विलास बारी | Published: September 29, 2023 07:39 PM2023-09-29T19:39:36+5:302023-09-29T19:39:50+5:30
रामदेववाडीजवळ झाला अपघात, दोन्ही युवक मेहरूणचे
जळगाव : तालुक्यातील वावडदा येथे मित्राचे शेत पहायला गेलेल्या दोन युवकांचा जळगावकडे येताना, रामदेववाडी जवळ गुरुवारी ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा युवक जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
निलेश गोकुळ पाटील (वय २५, रा. राम मंदिर, मेहरूण) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर महेश रविंद्र खोरपडे (वय ३०, पाणीपुरवठा कार्यालय परिसर, जळगाव) हा युवक जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेश व महेश हे दोन्ही वावडदा येथे गेले होते. महेशचे वावडदा येथे शेत असल्याने, ते शेत पहायला हे दोन्ही गेले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. गुरुवारी सायंकाळी वावडदा येथून जळगावला परत येत असताना, सायंकाळी ६. ३० वाजता रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शुक्रवारी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा मृत्यू झाला. महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील हा डीजीटल बॅनर तयार करण्याचे काम करत होता. तर निलेशचे वडिल गोकुळ पाटील हे एका कंपनीत चालक म्हणून काम करतात. निलेशच्या आईचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. निलेश एक लहान भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. अपघाताबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.