प्रातर्विधीस बसलेल्या दोघांना कारने उघडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:12+5:302020-12-23T04:13:12+5:30
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे सोमवारी रात्री व पाळधी, ता.धरणगाव येथे मंगळवारी सकाळी अपघात झाला. त्यात दोन जण ठार, ...
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे सोमवारी रात्री व पाळधी, ता.धरणगाव येथे मंगळवारी सकाळी अपघात झाला. त्यात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रभाकर दामोदर भावसार (वय ५०, रा. पाळधी, ता. धरणगाव) व ईश्वर अर्जुन पाटील (वय ३२, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे मृतांची नावे असून, शेख मुक्तार शेख उस्मान (वय ६०, रा.पाळधी, ता.धरणगाव) जखमी झाले आहेत. याप्रकरणी अनुक्रमे पाळधी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
प्रातर्विधीस बसलेल्या दोघांना कारने उडविले
प्रभाकर भावसार व शेख मुक्तार शेख उस्मान दोघं मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र स्वाॅ मिलजवळील मोकळ्या जागेत प्रातर्विधीसाठी बसले होते. जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात जाऊन दोघांना धडकली. यात प्रभाकर भावसार जागीच ठार झाले, तर शेख मुक्तार हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघात होताच कारचालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, घटना घडताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. दोघांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात प्रभाकर भावसार यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मृत घोषित केले. भावसार हे आचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी अरुणा, आई चिंधाबाई, दीपक आणि कल्पेश ही दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्रात कारचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कामावरून परतणाऱ्या मजुराला उडविले
चिंचोली, ता. जळगाव येथील रहिवाशी ईश्वर अर्जुन पाटील हा तरुण सोमवारी रात्री काम आटोपून दुचाकीने (क्र. एमएच १९ बीएस ५२१६) कुसुंबा गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर पाटील १० ते १५ वर्षांपासून सेंट्रिंगगची काम करायचे. महिन्याभरापासून जळगाव शहरात ते बांधकामाचे ठिकाणे कामाला येत होते. सोमवारी सकाळी १० वाजता ते दुचाकीने शहरात आले व रात्री ८ वाजता घरी परत जात असताना हा अपघात झाला. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. ईश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आणि आई मथुराबाई आणि वडील अर्जुन पाटील असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.