केळीला बसतोय करपा रोगाचा फटका
By admin | Published: February 9, 2017 11:28 PM2017-02-09T23:28:36+5:302017-02-09T23:28:36+5:30
वातावरण बदलाचा परिणाम : हातच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती
वडजी, ता.भडगाव : परिसरात तीन-चार वर्षापासून लहरी निसर्गाच्या अवकृपेमुळे व वातावरण बदलामुळे केळी लागवडीत मोठी घट आली आहे. मात्र यंदा चांगल्या पावसामुळे केळीची चांगली लागवड झाली आहे. मात्र काही दिवसांपासून तापमान अचानक कमी झाल्याने लागवड झालेल्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
पूर्वी केळी पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. दुष्काळी स्थितीमुळे केळी क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे काही प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र हवामानाच्या बदलामुळे करपा रोग वाढला आहे. वडजी येथील शेतकरी शांताराम कुंभार यांच्या चार एकर क्षेत्रातील संपूर्ण केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचप्रमाणे अनेक शेतक:यांच्या केळीला करप्याची लागण झालेली दिसून येत आहे.
केळी पिकाला मागील काही वर्षापासून बाजारभाव कमी असल्याने शेतक:यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यासाठी परिसरात केळीवर प्रक्रिया उद्योग उभे राहणे गरजेचे असून स्थानिक बाजारपेठेत केळीला चांगला भाव मिळून शेतक:यांना आर्थिक लाभ होऊ शकतो व मजुरांना रोजगार मिळू शकतो. शासनाने काही उपाययोजना न केल्यास गिरणा परिसरातून केळी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)