मालवाहतूक वाहनाने पाच भिक्षुकांना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:58 AM2019-03-17T11:58:29+5:302019-03-17T11:58:39+5:30
चालक वाहनासह पसार
जळगाव : सिंधी कॉलनीकडून पांडे चौकाकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील शनिमंदिराजवळ बसलेल्या पाच भिक्षुकांना उडविल्याची थरारक घटना शनिवारी रात्री ७़४५ वाजता घडली़ ही घटना पाहून प्रत्यक्षदर्क्षींचा थरकाप उडाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला़ वाहनाचा क्रमांक काही नागरिकांना टिपून पोलिसांना दिला.
पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील शनिमंदिराजवळ दर शनिवारी मोठ्या संख्येने भिक्षेकरी हे भिक्षेसाठी बसतात़ शनिवारी देखील मंदिराशेजारी पडलेल्या वाळूजवळ भिक्षेकरी बसलेले होते़ रात्री ७़४५ वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने सिंधी कॉलनी परिसराकडून पांडे डेअरी चौकाकडे येत होते.
या चारचाकीने भिक्षुकांच्या अंगावर वाहन घालत पाच जणांना उडवले़ यानंतर वाहनचालक पांडे डेअरी चौकाच्या दिशेने पसार झाला़ अपघातानंतर मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी धाव घेतली़
असे आहेत जमखींची नावे
मालवाहतूक वाहनाच्या धडकेत मधुकर कोळी यांच्यासह जिजाबाई रमेश राजपूत (५५, रा़ दौलतनगर), बाबुलाल देवराव चावरे (६५, रा़ काव्यरत्नावली चौक परिसर), मधुकर रामचंद्र पाटील (६३, रा़ भुसावळ), शारदाबाई गणपत पारधे (६५, रा़ पांडे चौक परिसर) हे जखमी झाले आहेत़ यांच्या देखील डोक्याला, हाताला तसेच कमरेला मार बसला आहे़
या जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले़ काही जणांना उपचार करुन घरी पाठविण्यात आले.
इतरानाही बसला मुकामार... या पाच जखमी भिक्षुकांहस आठ ते दहा भिक्षूक देखील त्या ठिकाणी बसले होते़ त्यातील दोन ते तीन महिलांना देखील वाहनाचा फटका बसल्यामुळे मुकामार बसला़ दरम्यान, घटनेनंतर त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली होती़
पाच ते दहा फूट नेले फरफटत
भरधाव वाहनाने मधुकर काळू कोळी (वय-६५, रा़ तुकाराम वाडी) यांना चक्क पाच ते दहा फूट फरफटत नेले़ त्यामुळे त्यांचे डोके आणि पायाला गंभीर ईजा झाल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत ते जमीनीवर पडून होते़ अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक मनोहर आहुजा, भूषण सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यांनी व एमआयडीसी पोलीस स्टेशनेचे किशोर पाटील यांनी लागलीच जखमी पाच भिक्षुकांना वाहनात बसवून जिल्हा रूग्णालयात हलविले़