कर्तव्यावर असताना वाहकाला हृदयविकाराचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:18+5:302021-03-07T04:15:18+5:30
जळगाव : जळगाव आगारातून अंजनविहिरे येथे रात्री मुक्कामासाठी गेलेल्या बसवरील वाहकाला शुक्रवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना झाली. ...
जळगाव : जळगाव आगारातून अंजनविहिरे येथे रात्री मुक्कामासाठी गेलेल्या बसवरील वाहकाला शुक्रवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना झाली. बसवरील चालकाने तत्काळ त्यांना जळगावला हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. बळीराम विठ्ठल सावंत असे या मयत वाहकाचे नाव आहे.
जळगाव आगाराचे व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी माहिती दिली. बळीराम सावंत हे वाहक जळगाव आगारात कार्यरत होते. शुक्रवारी रात्री त्यांच्याकडे धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे या गावात मुक्कामाला बस नेण्याची जबाबदारी होती. त्यानुसार वाहक सावंत व चालक झेंडू सोनवणे यांनी जळगाव आगारातून सायंकाळी अंजनविहिरे या ठिकाणी मुक्कामी बस नेली. या ठिकाणी सावंत यांना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक छातीत दुखायला लागले. यावेळी चालक झेंडू सोनवणे यांनी तात्काळ गावातील खासगी डॉक्टरांना उपचारासाठी बोलविले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून, सावंत यांना पुढील उपचारासाठी जळगावला नेण्याचे सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी तत्काळ सावंत यांना बसने जळगावला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सावंत यांना मयत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, सकाळी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, कामगार अधिकारी प्रशांत महाजन व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महामंडळाच्या नियमानुसार प्रज्ञेश बोरसे यांनी आर्थिक मदत म्हणून तत्काळ ५ हजार रुपये सावंत यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. तर नियमानुसार इतरही मदत महामंडळातर्फे देण्यात येणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.