चाळीस रुपये प्रति किलो दराने कैरी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:44+5:302021-06-20T04:12:44+5:30
खडकदेवळा, ता. पाचोरा : महाराष्ट्रीयन जेवणात कैरीचे लोणचे नसेल तर जेवणाची सारी लज्जत जाते. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे ...
खडकदेवळा, ता. पाचोरा : महाराष्ट्रीयन जेवणात कैरीचे लोणचे नसेल तर जेवणाची सारी लज्जत जाते. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरात बनविले जाते. पाचोरा येथे आठवडे बाजारात लोणच्यासाठी लागणारी कच्च्या कैरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रतिकिलो ४० रुपये या दराने कैऱ्यांची विक्री होत आहे.
जून महिना लागला की लोणचे टाकण्याची लगबग प्रत्येक घरात सुरू होते. शनिवारच्या आठवडे बाजारात खास लोणच्याची कैरी मोरभवनच्या मागच्या बाजूला दुकाने लावण्यात आली होती. सकाळी ४० रुपये प्रति किलोने विक्री झाली यात तोतापुरी नीलम बदाम व गावरान मध्यम आकाराची कैरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. पण गावरान कैरीची मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर लोणचे टाकण्यासाठी लागणारी साहित्याची दुकान लावण्यात आली होती. सोबत कैरी कापून देण्यासाठीदेखील दुकाने लावण्यात आली आहेत. कैरी खरेदीसाठी संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात महिलांची लगबग सुरू होती.
कैऱ्या फोडणाऱ्यांना रोजगार
कैऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढ्याच प्रमाणत खरेदीदारांची गर्दी वाढली असून याचठिकाणी कैरी फोडण्यासाठी दुकाने थाटली होती. कैरी फोडणे व त्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ठिकठिकाणी कैरी फोडणारे १० रुपये किलो याप्रमाणे कैरी फोडून देत होते. त्यातून दिवसाकाठी १ ते २ हजार रुपये कमवले जातात.
कैरी घेण्यासाठी आलो आहे. या ठिकाणीच लोणचे टाकण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध झाल्याने गावातील बाजारात जाण्याची गरज नाही. माझ्या घराजवळील मोर भवनच्या पाठीमागे आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर चांगल्या कैरी आल्यामुळे मला निवड करायला संधी मिळाली.
-सुभाष मोर, पाचोरा
कैरी लोणच्याची ‘खमंग गोडी’ आजही कायम
भातखंडे बुद्रूक, ता. भडगाव : आजघडीला बाजारात प्रत्येक वस्तू तयार मिळत असल्याने शहरी व ग्रामीण भागातही रेडिमेडवर भर दिला जात आहे. रोजच्या जेवणात चव वाढवणारे तिखट आंबट चवीचे लोणचे हे घरगुती जास्त पसंत केले जाते. आजही घरी तयार केलेल्या आंब्याच्या लोणच्याला मोठी मागणी असून ग्रामीण व शहरी भागातही लोणच्याची चव आजही टिकून आहे. संध्या आंब्याचा हंगाम सुरू असून पाऊस पडण्यापूर्वी आंब्यांचे लोणचे तयार करण्याचे दिवस आहेत. प्रामुख्याने मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात ग्रामीण भागातील महिला कच्या कैरीपासून लोणचे बनवितात बाजारात यंदा आंबा मुबलक प्रमाणात असून या भागासह आता लोणचे तयारीची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागात कैरी लोणच्याची ‘खमंग गोडी’ आजही कायम आहे.
===Photopath===
190621\19jal_6_19062021_12.jpg
===Caption===
आठवडे बाजारात कैरी खरीदण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी. (छाया : आत्माराम गायकवाड )