पंचवीस किलोचे ओझे घेऊन ध्येयवेडा तरूण ५० किमीपर्यंत धावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:31 PM2020-08-31T20:31:27+5:302020-08-31T20:32:50+5:30
ऐकावे ते नवलच....: साडेनऊ तासात केली मोहीम पूर्ण
शिरसोली : शिरसोली येथून सकाळी पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन जळगाव ते पाचोरा हे अंतर पन्नास किलोमीटर पळत गाठायचे, या ध्येयाने पछाडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी शिरसोलीमध्ये एकच गर्दी झाली. त्याने हे अंतर अवघ्या साडेनऊ तासात पूर्ण केले.
आपले ध्येय कोणतेही असो, ते गाठण्यासाठी चिकाटी अन् जिद्द आवश्यक असते. याचा प्रत्यय शिरसोलीकरांना रविवारी आला. जळगाव ते पाचोरा पन्नास किलोमीटरचे अंतर पाठीवर २५ किलो वजन घेऊन धावण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या एका युवकाची. राहुल पाटील असे या युवकाचे नाव. वय अवघे २४ वर्षे! जळगाव येथील एका जिममध्ये तो प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याने जळगाव येथील डी. एस. पी. चौकापासून ते पाचोरा हे पन्नास किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली. सायंकाळी साडेचार वाजता तो पाचोरा येथे पोहचला.
यावेळी रस्त्यात वडली ते सामनेर या आठ किमी अंतरात पाऊसही सुरु होता. तरीदेखील त्याने पळणे थांबविले नाही. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत करून त्याचा उत्साह वाढविला. मित्र रुपेश परदेशी, राहुल पाटील व राकेश आहिरे यांनी त्याला मदत केली.
आर्मीचे जवान पाठीवर ५० किलोचे वजन घेवून डोंगर पठारावर धावू शकतात तर आपण का नाही पंचवीस किलोचे वजन घेवून ५० किमीचे अंतर पळू शकत? यासाठी मी ५० किलोमीटर पळण्याचा चंग बांधला आणि ग्रामस्थ व मित्रांच्या मदतीने हे अंतर सात तासात पूर्ण केले.
-राहुल पाटील