बोगस खत विक्री प्रकरणी जामनेरात आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2023 23:27 IST2023-07-17T23:27:26+5:302023-07-17T23:27:58+5:30
जामनेर तालुक्यातील बोगस खतविक्री प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले.

बोगस खत विक्री प्रकरणी जामनेरात आठ जणांविरुद्ध गुन्हा
मोहन सारस्वत, जामनेर (जि. जळगाव) : जामनेर तालुक्यातील बोगस खतविक्री प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. याप्रकरणी जामनेर पोलिसात आठ जणांविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात राजकोट (गुजरात) येथील तीन, जळगावातील दोन वितरक आणि जामनेर तालुक्यातील तीन विक्रेत्यांचा समावेश आहे. जामनेर तालुक्यात पाच ते सहा गावांमधील शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांना मिश्रखते दिली होती. त्यानंतर कपाशीची वाढ न होता पाने पिवळी पडली आणि तर काही पाने जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या बोगस खतविक्री प्रकरणाचे पडसाद उमटले. यानंतर कृषी खात्याचे अधिकारी सायंकाळी जामनेर पोलिस ठाण्यात पोहोचले. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी विजय पवार यांनी फिर्याद दिली. त्यावरून यात राजकोट (गुजरात) येथील ३ खत उत्पादक, जळगाव येथील दोन वितरक तसेच मोयखेडे दिगर, तोंडापूर व तोरनाळे येथील खत विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गणेश अहिरे करीत आहेत.