अंजली दमानियांविरुध्द एकनाथराव खडसे जळगाव न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:43 PM2018-08-28T12:43:10+5:302018-08-28T12:43:54+5:30
बदनामी प्रकरण
जळगाव : अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर बदनामी केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात आपला जबाब नोंदविला. खडसे दुपारी तीन वाजता न्यायालयात आले होते. अर्धा तास कामकाज चालले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी १३ एप्रिल २०१८ रोजी व्टिटरवर एकनाथराव खडसे यांनी माझ्याविरोधात २२ खटले दाखल केले आहेत. मला त्रास व्हावा या उद्देशानेच त्यांनी हे खटले दाखल केले आहेत. रावेर न्यायालयाची तर त्यांनी दिशाभूल केली आहे. न्यायालयाला मॅनेज करुन माझ्याविरुध्द पकड वारंट काढायला लावले असे त्यात म्हटले आहे. व्टिटरवरील या उल्लेखामुळे खडसे यांनी दमानिया यांना १८ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती. त्याला प्रतिसाद न दिल्याने खडसे यांनी जळगाव येथील प्रथम न्यायदंडाधिकारी आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यावर सोमवारी खडसे यांचा जबाब झाला.
या जबाबात खडसे यांनी रावेर न्यायालयात सुनील पाटील यांनी खटला दाखल केलेला आहे. त्यात मी फिर्यादी नाही किंवा साक्षीदारही नाही. न्यायालयावर दबाव आणणारा मी कोण आहे? दमानिया यांच्या व्टिटमुळे माझी बदनामी झाली असून स्थान व प्रतिष्ठा मलिन झालेली आहे असे खडसे यांनी न्यायालयात सांगितले. खडसे यांच्यावतीने अॅड.प्रकाश बी.पाटील यांनी कामकाज पाहिले.
आता पुढील कामकाज ३१ आॅगस्ट रोजी होणार आहे.