आपत्कालीन स्थितीत २ मिनिटांत होईल ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:17+5:302021-04-25T04:16:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीच आधीपासून नेमण्यात आली ...

In case of emergency, alternative oxygen will be provided in 2 minutes | आपत्कालीन स्थितीत २ मिनिटांत होईल ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था

आपत्कालीन स्थितीत २ मिनिटांत होईल ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीच आधीपासून नेमण्यात आली आहे. काही आपत्कालीन स्थिती उद्‌भवली तरी केवळ दोन मिनिटांत दुसरी पर्यायी व्यवस्था कार्यरत होईल, अशी यंत्रणाच आम्ही विकसित केली आहे. शिवाय याची स्वतंत्र जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे, याचे प्रात्यक्षिकही आम्ही घेतले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. बेड मॅनेजमेंटपासून औषधींपर्यंत विविध समित्या नेमल्याने कामात सुटसुटीतपणा व वैद्यकीय सेवा अधिक सुरळीत झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : सध्या रुग्णांची स्थिती कशी आहे, गंभीर रुग्ण अधिक येण्याचे कारण काय?

डॉ. रामानंद : रुग्णालयातील ३८६ पैकी ३१३ रुग्ण गंभीर आहेत. या रुग्णालयात गंभीर रुग्णांनाच दाखल करण्यात येते. आपत्कालीन कक्षात रुग्णाला दाखल करून त्याला गरजेनुसार ऑक्सिजन लावून नंतर कक्षात दाखल करण्यात येत असते. गेल्या लाटेपेक्षा यंदाच्या विषाणूची क्षमता अधिक असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रश्न : रुग्णसंख्या वाढत असल्याने खाटा वाढविण्याचे काही नियोजन आहे का?

डॉ. रामानंद : सद्य:स्थितीत आम्ही महापालिका व मोहाडी रुग्णालय अशा तिन्ही यंत्रणा हातात हात घालून कार्यरत आहोत. आमच्याकडचा थोडा बरा झालेला रुग्ण आम्ही या ठिकाणी हलवितो, जेणेकरून बेड रिकामा होऊन गंभीर रुग्णाला जागा उपलब्घ होईल. आजपर्यंत आपण जागा नाही म्हणून एकाही रुग्णाला परत पाठविले नाही. आहे त्या स्थितीत आपण रुग्णाला आपत्कालीन कक्षात दाखल करून त्याच्या गरजेनुसार ऑक्सिजन लावतो. त्यानंतर बेड कमिटी उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करून देते. आताच्या स्थितीत बेड वाढविण्याचे नियोजन नाही.

प्रश्न : मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहे.

डॉ. रामानंद : प्रत्येक कक्षात एका ज्युनिअर डॉक्टरबरोबर एक फिजिशियन, एक सहयोगी किंवा सहायक प्राध्यापक, अशीच यंत्रणा आमची कार्यरत आहे. या ठिकाणी गंभीर रुग्णच येत असल्याने मृत्यू होत आहेत. मात्र, ते कमी करण्यावर आमचा पूर्ण भर आहे. कामाच्या विकेंद्रीकरणासाठी आम्ही मृत्यू परीक्षण समिती, खाटांच्या नियोजनाची समिती, औषध समिती, ऑक्सिजन समिती, वॉर रूम, व्हेंटिलेटर समिती स्थापन केल्या आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे. त्यानुसार कामे अधिक सुटसुटीत होत आहेत. शिवाय रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यास यंत्रणेला वेळ मिळत आहे.

प्रश्न : नाशिकच्या घटनेसारखी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आपण तयार आहोत का?

डॉ. रामानंद : गेल्या महिन्यापूर्वीच आपण डॉ. संदीप पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन समिती स्थापन केली असून, यात दोन तंत्रज्ञ, एक लिपिक, स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा, दोन ऑक्सिजन नर्स, अशी पंधरा जणांची एक टीम आहे. जी २४ तास याबाबत दक्ष असते. शिवाय आपल्याकडे टँक येण्याआधी पुरवठा करणारे पाच पॉइंट होते. त्यातून जम्बो सिलिंडर भरले जायचे ही यंत्रणा सुरू असून, आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास कोणी काय करावे, हे आधीच ठरवून देण्यात आले आहे. त्याचे प्रात्यक्षिकही आम्ही घेतले आहे. त्यानुसार दोन मिनिटांत ही पर्यायी व्यवस्था कार्यरत होणार आहे.

कोट

या रुग्णालयातून सहा हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. डॉक्टर व सर्व कर्मचारी वर्षभरापासून जे काम करीत आहे ते अविस्मरणीय आहे. अनेक त्रुटी असतील, मात्र त्यात सुधारणा करून अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, विनामास्क वावरू नये - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.

Web Title: In case of emergency, alternative oxygen will be provided in 2 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.