४५ लाखांचे अनुदान हडपल्याच्या प्रकरणात संशयित मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:35 AM2019-03-15T11:35:24+5:302019-03-15T11:36:15+5:30
नऊ महिने बेकायदेशीर चालले केंद्र
जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने काही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरी देखील पोलिसांनी अद्याप एकाही संशयिताला अटक केलेली नाही. एरव्ही अनेक गुन्ह्यात आरोपी अटकेची घाई करणारी यंत्रणा या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे.
महाबळ परिसरातील निमजाई फांऊडेशनचे भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील यांनी खोट्या सह्या करुन मयुरेश्वर स्कुल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार केले तसेच सदस्य भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनीही खोटा ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याचा गुन्हा दीड महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. एकीकडे हातात पुरावे असल्यानेच गुन्हा दाखल केला असे पोलीस सांगत असताना दुसरीकडे न्यायालयानेही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चौघांचा अटकपूर्व फेटाळला. असे असतानाही यात अजून कोणालाच अटक केली नाही. एका संशयिताला पोलिसांनी आणलेही होते, मात्र पुढे काय झाले हे कळलेच नाही.
अनधिकृत सुरु होते केंद्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑ राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत रायपुर येथे सुरु केलेले केंद्र भूषण बक्षे व शीतल पाटील यांनी पिंप्राळा येथे हलविल्याचे दाखविले, प्रत्यक्षात तेथे काहीच सुरु नाही. गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हे केंद्र चालविले जात आहे.
या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या केंद्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने मुंबई कार्यालयात पाठविला.
त्याआधी ९ महिने हे केंद्र अनधिकृतच चालले. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीन पत्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, इतर सात केंद्रामध्ये हजेरीत बनवेगिरी आढळून आल्याने त्यांचा अनियमिततेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, त्याच प्रमाणे निमजाईच्या या केंद्रातील हजेरीही संशयास्पद आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. पोलीस तपास सुरु आहे इतकेच सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
स्थानिक अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात
कोणत्याही केंद्राचा पत्ता बदल करावयचा असेल तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा तपासणी अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो. या कार्यालयाने इतर सात केंद्राचा अनियमिततेचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला, मग याच केंद्राचा का पाठविला नव्हता, असाही प्रश्न निर्माण होत आहे. तपासाधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे मिळविली असून स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पोलीस म्हणतात, तपास सुरु आहे
या प्रकरणात आरोपींना अटकेबाबत प्रभारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षकरणजीत शिरसाठ यांना विचारला असता पुरावा असल्यानेच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अजूनही तपास सुरु आहे. त्यासाठी तपासाधिकारी मुंबईलाही जावून आले. आरोपींच्या अटकेबाबत बोलण्यास मात्र त्यांनी टाळले. संदीप यांच्याशी संपर्क साधला असता ते औरंगाबाद येते खंडपीठात होते.
यापूर्वीच फेटाळला यांचा अटकपूर्व
निमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४०) मोहीनी भरत भंगाळे (३१) दोन्ही रा.भवानी पेठ, राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.