परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय
By अमित महाबळ | Published: May 20, 2023 06:59 PM2023-05-20T18:59:19+5:302023-05-20T18:59:57+5:30
एखाद्या महाविद्यालयात कॉपी केस आढळून आल्यास विद्यापीठाच्या वतीने प्राचार्यांना पत्र बजावले जाणार आहे.
अमित महाबळ, जळगाव: परीक्षांचे नियोजन आणि विहित मुदतीत निकाल लावण्याचा विषय कबचौउमविने गंभीरतेने घेतला असून, त्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेवेळी होणारी कॉपी रोखण्यासाठी कुलगुरूंनी कठोर भूमिका घेतली आहे. एखाद्या महाविद्यालयात कॉपी केस आढळून आल्यास विद्यापीठाच्या वतीने प्राचार्यांना पत्र बजावले जाणार आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये परीक्षांचे वेळापत्रक, उत्तरपत्रिकांचे ई-मूल्यांकन व त्यातील प्राध्यापकांचा सहभाग आदी मुद्दे उपस्थित झाले. परीक्षेतील कॉपीचे प्रमाण रोखणेबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यावर काही निर्णय घेण्यात आले आहेत. दक्षता पथकांना कॉपी निर्मूलनासाठी कडक उपाय करणेबाबत सूचना देण्यात येणार आहेत. ज्या महाविद्यालयात १० किंवा त्यापेक्षा जास्त कॉपी केसेस आढळून येतील त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाकडून पत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर (हॉल तिकीट) गैरप्रकार केल्यास होणाऱ्या शिक्षेची तरतूद नमूद करण्यात येणार आहे.
... अन्यथा प्राध्यापकांचा समितीवर जाण्याचा मार्ग बंद
- परीक्षांचे निकाल विहित मुदतीत लावणे हे प्रमुख लक्ष्य विद्यापीठासमोर आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत झाली तरच हे शक्य होणार आहे. मात्र, अजूनही बरेच प्राध्यापक या कामात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे आहे. यावरही बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली.
- ज्या शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात सहभाग घेतला आहे त्यांनाच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधी प्राधान्याने देण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला. विद्यापीठामार्फत महाविद्यालय संलग्नीकरण समित्या, मुलाखतींसाठी विषय तज्ज्ञ आदी विविध समित्यांवर विद्यापीठ संलग्नित शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात. या समित्यांवर शिक्षकांना पाठविण्याचा अधिकार विद्यापीठाकडे आहे.