विखेंच्याविरोधात कारवाई टाळणाºया चंद्रकांत पाटील, सहकार मंत्र्यांविरोधात खटला दाखल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:53 PM2017-11-19T16:53:42+5:302017-11-19T16:55:10+5:30
अॅड.संजीव पुनाळेकर यांची टीका: ‘पद्मावती’ला विरोध; केसेस दाखल करण्याचा इशारा
जळगाव: बोगस शेतकरी दाखवून ३५ कोटीचे कर्ज घेऊन त्यापोटी ८ कोटी ३६ लाखांचा ‘लोन वेव्हर’चा लाभ घेणाºया विखे यांच्या कारखान्याने हा प्रकार उघडकीस आणल्यावर रक्कम परत केली. त्यामुळे कारवाईची गरज नसल्याचे सहकार मंत्री, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यांना तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नोटीस काढून खटला दाखल करणार, असल्याची माहिती हिंदू विधी परिषदेचे राष्टÑीय सचिव अॅड.संजीव पुनाळेकर यांनी रविवारी दुपारी आचार्य कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रपरिषदेत यांनी दिली.
यावेळी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपातून सुटलेले सुधाकर चतुर्वेदी, हिंदू जनजागृती समितीचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, सुनील घनवट उपस्थित होते. यावेळी राजकारणी शेतकºयांचा पैसा असा खाऊन टाकतात. त्यामुळेच त्यांना आंदोलन करण्याची व गोळीबाराला सामोरे जाण्याची वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली.
प्लॉटचा मोठा घोटाळा
राज्यात प्लॉटचा मोठा घोटाळा असून १-१ रूपया नाममात्र दराने राजकारण्याच्या शैक्षणिक संस्थांना, कारखान्यांना जागा देऊन टाकल्या जातात. मात्र अण्णा हजारेंसोबत असणारे विश्वंभर चौधरींसारखे लोक व पुरोगामी याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करतात. मात्र भ्रष्टाचार उघडकीस आणणे ही काही पुरोगाम्यांची मक्तेदारी नाही. हिंदू विधी परिषदेनेही जिथे कुठेही भ्रष्टÑाचार दिसेल, तो उघडकीस आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
पगारी पुजारी नेमण्याची योजना विकृतपणाची
अॅड.पुनाळेकर म्हणाले की, देवस्थानांमध्ये पगारी पुजारी ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र हिंदूू विधी परिषद त्याविरोधात याचिका दाखल करेल. मंदिरात जे भाविक येऊन पैसे दान करतात, त्यांना ते पैसे देवाच्या, धर्माच्या कामासाठी वापरले जावे, अशीच अपेक्षा असते. अन्यथा ते दवाखान्यासाठी, किंवा अन्य कामांसाठी अन्य ठिकाणी जाऊन दान करू शकतात. त्यामुळे मंदिरांच्या पैशातून हिंदूना मदत व्हायला हवी. जलयुक्त शिवारसाठी पैसे देणे, दवाखान्यासाठी पैसे देणे हे मंदिरांचे काम नाही. त्यासाठी शासनाने भ्रष्टाचाºयांवर कारवाई करून पैसा जप्त करावा व तो वापरावा. मंदिरांवर पगारी पुजारी नेमायचे असतील तर आधी शासनाने मंदिर व वेदपाठशाळा उभाराव्यात. त्यानंतर त्यावर पगारी पुजारी नेमावेत. पगारी पुजारी नेमण्याची शासनाची ही योजना विकृतपणाची आहे. अनेक देवस्थानांवर जिल्हाधिकाºयांना विश्वस्त म्हणून नेमले आहे. मात्र ही देवस्थाने माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकाºयांनी विश्वस्त म्हणून केलेले कामही भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कक्षेत येत नाही, असे शासनानेच माहिती अधिकारात दिलेल्या माहिती स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकार होतात. सिद्धी विनायक ट्रस्टच्या एका विश्वस्ताने तर दारूचे, तसेच प्रवासाचे अवास्तव बिल लावल्याचे व ते मंजूर झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कुडाळ येथे मंदिराची २ गुंठे जागा एका ख्रिश्चन व्यक्तीला १०० रूपयांने आयुष्यभरासाठी राहण्यासाठी देऊन टाकली. या सगळ्यांच्या अंगात संस्थानिक आले असून हे प्रकार हाणून पाडण्याची गरज असल्याचे सांगितले.
राममंदिरासाठी भूसंपादनचा तोडगा
अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने वेगळी योजना मांडली आहे. हा वाद मूळ जागेच्या मालकीचा आहे. त्यामुळे त्या वादात न पडता सरकारने थेट या परिसरातील १७० एकर जागेचे भूसंपादन करावे. त्यात परिसरातील घरे, मंदिर, मशिद आदी सर्व समाविष्ट असेल. संबंधीतांना शासनाने मोबदला द्यावा. जागा ताब्यात घेऊन त्यावर श्रीराम मंदिर बांधावे, असे टिपण यापूर्वीच हिंदू जनजागृती समितीने पाठविले आहे. मात्र राजकीय पक्षांचे मग तो भाजपा असो की काँग्रेस, राजकीय आखाडे वेगळेच असतात. कदाचित निवडणुकीच्या आधी यावर अंमलबजावणी होईल. किंवा निवडणुकीत पराभव झालाच तर हाती काही मुद्दा रहावा, म्हणून नंतर या मुद्याचा वापर होऊ शकतो, असे सांगितले.
धार्मिक छळ झालेल्यांना व्हीसा द्या
धार्मिक कारणावरून छळ झाल्याने लगतच्या चार-पाच देशातून भारतात आश्रय घेऊ इच्छिणाºया भारतीयांना व्हीसा मिळण्यात अडचणी होत्या. त्यासाठी हिंदू जनजागृती समितीने पाठपुरावा केला.
‘पद्मावती’ला विरोध
पद्मावती चित्रपटाचे ट्रेलर सेन्सॉरची परवानगी मिळण्यापूर्वीच रिलीज झाले. हा गुन्हा आहे. तसेच सेन्सॉरची परवानगी न मिळताच चित्रपट प्रसिद्ध झाला तर जेथेजेथे आमचे वकील आहेत, तेथे तेथे चित्रपटाविरूद्ध व चित्रपटगृह चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करू. असे चित्रपट करणे चुकीचे आहे. कलेच्या नावाखाली इतिहास बदलणे चुकीचे आहे. त्यामुळे जर दोन-चार चित्रपटगृह जाळले गेले अथवा एखाद्याला मारले तर फार चुकीचे झाले असे वाटायला नको. दीपीका पदुकोन हिने कायदा पाळावा, असे सांगितले आहे. मात्र ज्या विजय मल्ल्याच्या आधारे ती पुढे आली. त्या मल्ल्याला कायदा पाळ म्हणून आधी सांगावे, असा टोला लगावला.