झोऱ्यावरची एरंडोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:20+5:302021-06-16T04:22:20+5:30
एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. ...
एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. तो निर्णय सगळ्या नगराला मान्य असायचा. एक चक्र पद्धतीने निर्णयाची अंमलबजावणी व्हायची. थोडक्यात आज एखाद्या विवादात झालेला निर्णय चक्रीय पद्धतीने इतर विवादावर लागू असायचा. ज्याला आजच्या न्यायालयीन भाषेत सायटेशन अर्थात न्याय संदर्भ असे म्हणतो. यावरून त्या गावाचे नाव एकचक्र नगरी पडले असावे. त्या नगराच्या नावाने अनेक वाद मिटवले जात असत त्या नगराची ही कहाणी.
एरंडोली हा शब्द खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी भाषिकाच्या तोंडी खूपदा ऐकला जातो. काय असावा या शब्दाचा अर्थ. तसाच " टाका झोऱ्या किंवा झोऱ्यावर बसून घ्या " याचा वाक्यांश हा एरंडोली या शब्दांशी संबंधित आहे का ? यांचा एकमेकांशी काय संबंध ? यांचा शोध घेतला असता असा बोध होता की " झोऱ्या टाका, किंवा झोऱ्यावर बसून घ्या " म्हणजे सौद्यासाठी एकत्र बसून चर्चा करून घ्या असा सर्वसाधारणपणे होतो. मग झोऱ्याच का ? एरंडोल जवळ एक गाव आहे कासोदा. या गावात पूर्वी हातमागावर झोरे विणले जायचे. हे झोरे इतके मजबूत होते की या झोऱ्याची पारख त्या झोऱ्याला चारही बाजूंनी वर धरून त्यांत तांब्याभर पाणी ओतलं जायचं. हे पाणी खाली टपकलं नाही तर हा झोऱ्या मजबूत. मग या झोऱ्यावर बसून जे जे सौदे होत त्यात बहुतांशी ओढाताणी अधिक होत होती. ऊठबस व्हायची. मग ही सौद्यासाठी होणारी ओढाताण, उठबस बंद करून चार चौघांसमक्ष तडजोडीचा मार्ग स्वीकारला जायचा. या झोऱ्यावर बसून झालेला व्यवहार हा त्या झोऱ्यासारखा मजबूत. कोठेही न गळणारा. व्यवहारात एकाने एक पाऊल पुढे यावे आणि दुसऱ्याने एक पाऊल मागे जावे या सगळ्या प्रक्रियेत हा व्यवहार घडवणे ही एक भावना. ही जी तडजोड आहे तिला एरंडोली असं म्हणतात.
एरंडोली या शब्दाला काही भागात मांडवली असा शब्दप्रयोग असला ही तडजोडीची पद्धत एरंडोलमध्ये पौराणिक काळापासून चालत आलेली आहे. पांडवांचं काही काळ वास्तव्य एरंडोल, तत्कालीन नाव एक चक्रनगरी येथे होतं तेव्हा बकासूर नावाचा एक राक्षस रोज गावात येऊन धुमाकूळ घालत असे. तेव्हा त्या राक्षसाशी बोलणी करून त्याला लागणारं अन्न रोज एका घरून क्रमाक्रमाने दिलं जाईल, अशी तडजोड झाली. ती पुढे गावाचे नाव बदलाबरोबर एरंडोली या नावाने प्रसिद्ध झालेली आहे.
ही एरंडोली अर्थात तडजोड आज शासन दरबारात पोहोचली आणि त्यांचं गोंडस नामकरण झालं, लोक अदालत. लोक अदालतीत अनेक प्रकरणं असे तडजोडीने मिटवले जातात . तत्कालीन परिस्थितीत एरंडोली झोऱ्यावर व्हायची. आता त्याला कायद्याची वैध चौकट लाभली. कायद्याच्या कक्षेत तडजोडीने प्रकरणांचा निपटारा वेगाने होऊ लागला. विशेष म्हणजे यात दोघं पक्ष समाधानी. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांना विश्वास अधिक दृढ झाला. वृद्धिंगत झाला.
या सगळ्या राष्ट्रीय कामात एरंडोली या शब्दाचे योगदान ठळकपणे प्रतिबिंबित होते. एरंडोली पद्धतीने आपण आसपासची प्रकरणं सोडवण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक प्रदूषण दूर करण्यात आपला हातभार नक्कीच लागेल. सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण निकोप आणि सदृढ होईल.
ही आटपाट नगराची कहाणी सुफळ संपूर्ण.