लांडोरखोरी उद्यान म्हणजे नागरिकांसाठी आरोग्यवर्धक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:14 PM2019-06-05T12:14:49+5:302019-06-05T12:15:17+5:30
७०हून अधिक औषधी वनस्पती
जळगाव : वन विभागाने मोहाडी रस्त्यावर उभारलेले लांडोरखोरी उद्यान निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असून हा येथील आरोग्यासाठी आवश्यक वनस्पतींचा सहवास व निसर्गरम्य जॉगिंक ट्रॅकमुळे हा एक आरोग्यवर्धक ठेवा ठरला आहे.
स्वास्थ संकल्पनेस प्रोत्साहन
स्वास्थ संकल्पनेस प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी ३ कि.मी. लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात खुली व्यायामशाळा असून व्यायामाचे साहित्य नागपूर येथून आणण्यात आले आहे. या उद्यानात रान डुक्कर, नीलगाय, ससे, सरपटणारे प्राणी, पक्षांच्या विविध जाती, लांडगे यांचेही दर्शन घडते. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी निरीक्षण मनोरे, निसर्ग माहिती केंद्रही उपलब्ध करून देण्याच आल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.
विविध वनांचे घडते दर्शन
या उद्यानात १६०० ते १७०० विविध जातीची झाडे आहे. सर्वधर्मीय वन अशी नवीन संकल्पना येथे राबविण्यात आलेली असून त्यात रामायण वन, रामायणात उल्लेख असलेल्या अनेक वनस्पती या उद्यानात दिसतील, महाभारत उद्यान, अशोक उद्यान, जैन उद्यान, इस्लाम उद्यान, ख्रिस्त उद्यान, त्रिफळा उद्यान, बौध्द उद्यान, गणेश आराधनेत लागणाºया विविध वनस्पतींचे गणेश वन, पंचवटी वन, गुलाब उद्यान, नंदन वन, लाख वन, १२ राशी व २७ नक्षत्रे नुसार विविध राशींसाठी लाभ दायक असलेले वृक्ष माहितीसह नक्षत्र उद्यान, अंजिर उद्यान, ताड उद्यान, वेळू उद्यान निर्माण करण्यात आले आहे. औषधांचे गुणधर्म असलेल्या औषधांची झाडेही येथे मोठ्या प्रमाणात आहे. यात खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यासारख्या ७० हून अधिक वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मासह माहिती देण्यात आलेली आहे.
उद्यानासाठी १.८ कोटींचा खर्च
उद्यानात ७०हून अधिक वनस्पती, सरपटणाºया प्राण्यांच्या १५ पेक्षा अधिक प्रजाती, पक्षांच्या ६८, बांबू उद्यानात ३५ प्रकारच्या बांबू प्रजाती, अंजीर उद्यानात अंजीर प्रजाती, ताड उद्यानात ३२ ताड प्रजाती, हर्बल उद्यानात मानवी प्रकृतीस आवश्यक अशा १०८ प्रकारच्या वनस्पती आहेत. वनविभागाने येथे गेल्या पाच ते सहा वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे. लांडोरखोरी उद्यान उभारणीसाठी १.८ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
७० हेक्टर पैकी १० हेक्टरवर उद्यान
वनविभागाच्या ७० हेक्टर अशा विस्तीर्ण जागे पैकी सुमारे १० हेक्टर जागेवर उद्यान बनविण्यात आले. १ जुलै २०१६ रोजी उद्यानासाठी पहिले झाड लावण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरातच हे उद्यान पूर्ण होऊन खुले करण्यात आले. १४ आॅगस्ट २०१७ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उद्यानाचे उद्घाटन केले होते.