कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी : कैद्यांची साक्ष आता व्हीसीद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:11 PM2020-03-18T13:11:46+5:302020-03-18T13:12:26+5:30
न्यायालयाच्या वेळेतही बदल
जळगाव : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून न्यायालयाच्या कामकाजात मंगळवारपासून बदल करण्यात आला आहे. तसेच कैद्यांची साक्षही कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) सुरु करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. कार्यालयीत कर्मचाऱ्यांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी मंगळवारी आदेश काढले.
या आदेशानुसार मंगळवारी फक्त सकाळसत्रातच कामकाज झाले. तालुका न्यायालयांसाठीही हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे. न्यायायलयीन कर्मचारी, अधिकारी व वकील यांनी देखील खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल व मास्क लावूनच कामकाज सुरु केले आहे. मंगळवारी ६० टक्के वकीलांनी तोंडाला रुमाल लावून कामकाज केले. कर्मचारी देखील हीच काळजी घेत आहे. भीती नाही, परंतु काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. वारंवार साबणाने हात धुणे, हस्तांदोलन टाळणे, किमान दोन मीटर अंतरावरुन संवाद साधणे ही काळजी घेतली जात असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ जळमकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
रुमाल व मास्कला परवानगी
कारागृहात दाखल असलेल्या कैद्याला नातेवाईकांनी रुमाल व मास्क आणून दिला तर ते देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रोज जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर येत आहेत. आवश्यक असेल तरच डॉक्टर कैद्याला रुग्णालयात हलविण्याच्या सूचना देतात. त्या वेळी पोलिसांच्या माध्यमातून कैद्याला रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, कैदी पार्टी पोलिसांनाही सॅनेटरायझर व साबण पुरविण्यात येत आहे.
कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच खबरदारी
कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व खबरदारीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक आशिष गोसावी यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर, साबण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक असोत किंवा गुन्ह्यातील आरोपींना कारागृहात दाखल करायला येणारे पोलीस व आरोपी यांना बाहेरच हात स्वच्छ धुवून व तोंडाला रुमाल लावून प्रवेश दिला जात आहे. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना देखील तोंडाला रुमाल व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अति महत्त्वाचे जबाब व दोषारोपाचेच आरोपी न्यायालयात
न्यायालयात खटला सुरु असलेल्या अति महत्वाच्या प्रकरणात ज्या कैद्याचा जबाब नोंदवायचा आहे किंवा दोषारोप ठेवायचा आहे, अशाच कैद्याला कारागृहातून न्यायालयात आणले जात आहे. अन्यथा सर्वच कैद्यांची साक्ष व इतर कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच घेतले जात आहे. प्रथमवर्ग व सत्र न्यायालय दोन्ही ठिकाणी हे कामकाज अशाच प्रकारे केले जात असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिली. तालुकास्तरावरील न्यायालयातही याच पध्दतीने कामकाज केले जात असून तेथीलही वेळेत बदल करण्यात आला आहे.
अपर महासंचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही सूचना दिल्या आहेत. अपवाद वगळता न्यायालयीन कामकाज व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे केले जात आहे. कैदी, त्यांना भेटायला येणारे नातेवाईक व कर्मचाºयांसाठी प्रवेशद्वारावरच साबण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे आल्यानंतर २० सेकंदात हात स्वच्छ धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -आशिष गोसावी, कारागृह अधीक्षक
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आरोपींची साक्ष देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जात आहे. महत्वाचे व तात्काळ कामकाजातच आरोपींना न्यायालयात आणले जात आहे. तेव्हा देखील आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील