एलसीबीच्या खुर्चीसाठी सावध पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:30 PM2018-11-24T13:30:42+5:302018-11-24T13:33:30+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) निरीक्षक सुनील कुराडे बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्याजागी नवीन अधिका-याचा शोध सुरु आहे. अनेक जण या खुर्चीसाठी रांगेत असले तरी त्यासाठी अधिका-यांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.
सुनील पाटील
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) निरीक्षक सुनील कुराडे बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्याजागी नवीन अधिका-याचा शोध सुरु आहे. अनेक जण या खुर्चीसाठी रांगेत असले तरी त्यासाठी अधिका-यांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. एलसीबीचे निरीक्षक म्हणजे पोलीस अधीक्षकांचा आत्माच मानला जातो.मात्र सद्यस्थिती पाहता या पदाचे टेंडर भरायला कोणी फारसे उत्सुक नाहीत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे व स्थानिक पातळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे दोन्ही अधिकारी पोलीस नियमावली, शिस्तीला प्राधान्य देण्यासह अवैध धंद्याच्या विरोधात आहेत.
वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे सुरुच ठेवल्यामुळे शिंदे यांनी तीन पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरुन काढून अकार्यकारी (साईड पोस्टींग) पदावर नियुक्ती दिली. तसेच अवैध धंदे चालकांच्या संपर्कात असलेल्या ७६ कर्मचा-यांनाही मुख्यालयात जमा केले. त्यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखेत मनापासून यायला कोणी अधिकारी तयार होत नसल्याची चर्चा पोलीस दलात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे मुळ काम गुन्हे उघडकीस आणण्याचे आहे. मात्र ते मुळ काम सोडून इतर कामातच अधिक रस घेतला जात असल्याने पोलीस अधीक्षकांनी या शाखेतील कर्मचाºयांनाही एक महिन्यासाठी मुख्यालयात जमा केले. स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागावी यासाठी अधिका-यांना मोठी कसरत करावी लागते. अगदी नेत्यांची मर्जी सांभाळण्यासापासून तर मोठ्या रकमेचे टेंडरही भरावे लागते. इतके सारे करुनही टेंडरचा खर्चच निघणार नसेल तर मग का म्हणून त्या खुर्चीवर बसायचे, असे मत काही अधिका-यांनी तयार केले आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही अधिकारी जिल्ह्याच्या बाहेर बदलून जाणार आहे. त्यामुळे दोन वर्ष कालावधी जिल्ह्यात बाकी असणारा अधिकारीच यासाठी प्रयत्नशील आहे.एरव्ही या पदासाठी प्रत्येकवेळी जोरदार स्पर्धा असते, ही वेळ मात्र त्याला अपवाद ठरली आहे.