सीबीआयकडून जळगावसह महाराष्ट्र, मध्य प्रदेशात एफसीआयच्या ४५ ठेकेदारांकडे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:09+5:302021-06-10T04:13:09+5:30
जळगाव : भारतीय अन्न महामंडळाचा (एफसीआय) शासकीय ठेका घेतलेल्या जळगावसह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ४५ ठेकेदारांकडे केंद्रीय गुन्हे ...
जळगाव : भारतीय अन्न महामंडळाचा (एफसीआय) शासकीय ठेका घेतलेल्या जळगावसह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ४५ ठेकेदारांकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासणी केली असून, काही कागदपत्रे व माहिती घेऊन हे पथक परतले आहे.
अधिकाऱ्यानंतर ठेकेदारांकडे मोर्चा
भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांचा (एफसीआय) शासकीय ठेका देणाऱ्या एफसीआय अधिकाऱ्याकडे काही दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने ज्या ठेकेदारांना गोदामांचा ठेका वितरित केला, त्या ठेकेदारांकडे सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केली. यामध्ये मंगळवार, ८ जून रोजी या पथकाने जळगावसह महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील ४५ ठेकेदारांकडे तपासणी केली.
मध्य प्रदेशातील ठेक्याविषयी जळगावात तपासणी
सीबीआयच्या पथकाने जळगावातदेखील तपासणी केली. ट्रान्सलाईनची मोठी फर्म असलेल्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरातील तपासणी केलेल्या व्यावसायिकाकडे भारतीय अन्न महामंडळाचा (एफसीआय) शासकीय ठेका आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एफसीआयच्या ठेक्याविषयी पथकाने या ठेकेदाराच्या ट्रान्सलाईनच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. तपासणी दरम्यान ठेका, व्यवहारांची माहिती पथकाने घेतली.
सहा तास चौकशी
जळगावात ठेकेदाराकडे सीबीआयचे पथक सकाळी ११ वाजता पोहोचले. तेव्हापासून सुरू केलेली कागदपत्रांची तपासणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन हे पथक परतले.
चार-पाच वर्षांपूर्वीही चौकशी
मंगळवारी तपासणी झालेल्या ठेकेदाराकडे चार ते पाच वर्षांपूर्वीदेखील तपासणी झाल्याची माहिती मिळाली. त्या वेळी काही व्यवहारांविषयी तपासणी झाली होती, तर आता एफसीआय अधिकाऱ्याकडील छाप्यानंतर जळगावातील या ठेकेदाराकडे थेट सीबीआयने चौकशी केली.
बोलण्यास नकार
नाव समोर आलेल्या ठेकेदाराशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, या विषयावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.