सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 04:32 PM2021-02-01T16:32:09+5:302021-02-01T16:35:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असली तरी, विद्यार्थ्यांना खास परीक्षेसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असली तरी, विद्यार्थ्यांना खास परीक्षेसाठी गणवेश घ्यावा लागणार आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेगळा गणवेष घ्यावा लागतो. वर्षभर शाळांना टाळे असल्याने विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करीत होते. त्यामुळे यावर्षी गणवेशाचा प्रश्न आला नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी गणवेशाचे बंधन नको, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीही या समस्येविषयी मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र दिले आहे.
सीबीएससी अर्थात केंद्रीय शिक्षा बोर्डतर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी खास गणवेश घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांना त्याच गणवेशात येण्याचे बंधन असते. त्यामुळे पालकही असे गणवेश घेण्यास ना नसते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच गणित बिघडले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ४ मेपासून सुरू होत आहे. शाळांनी गणवेशाबाबत सूचना दिल्या आहेत. केवळ परीक्षेसाठी गणवेश घेणे पालकांना परवडणारे नाही. त्यामुळेच शाळांनी परीक्षेच्यावेळी गणवेशाची सक्ती करू नये, अशी मागणी होत आहे.
शाळांनाच टाळे, गणवेश घेतला नाही
कोरोनामुळे गेल्या वर्षी २२ मार्चपासून शाळांना टाळे लागले. ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. विद्यार्थी घरीच अभ्यास करीत असल्याने गणवेशाचा प्रश्न आला नाही. त्यामुळे पालकांनी गणवेश घेतले नाही. संपूर्ण देशात सीबीएससी बोर्डाची दहावीची परीक्षा ४ मे पासून सुरू होत आहे. गणवेषाची सक्ती झाल्यास समस्या निर्माण होईल. केवळ परीक्षेसाठी गणवेष घेणे पालक व विद्यार्थ्यांनाही शक्य नाही. त्यामुळे ड्रेसकोडची सक्ती करू नये, असा पालकांचा आग्रह आहे.
खासदार पाटील यांनी दिले पत्र
विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांना रविवारी ३१ रोजी पत्र देऊन वस्तुस्थिती मांडली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेषाची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनीही केली आहे.