सीसीआयची कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:58+5:302021-02-05T05:50:58+5:30
शेतकऱ्यांना आवाहन : केंद्र प्रभारींचे बाजार समितीला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : भारतीय कापूस निगम अर्थात 'सीसीआय'च्या माध्यमातून ...
शेतकऱ्यांना आवाहन : केंद्र प्रभारींचे बाजार समितीला पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : भारतीय कापूस निगम अर्थात 'सीसीआय'च्या माध्यमातून जळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कापसाची खरेदी येत्या शुक्रवारी थांबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यासंदर्भात आवाहन करून कृषी उत्पन्न बाजार समितीलाही केंद्र प्रभारींनी पत्र दिले आहे.
'सीसीआय'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस खरेदी करण्यासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगरात तसेच तालुक्यातील आव्हाणे शिवारात आणि तुरखेडे शिवारात यंदा पाच केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतांना सर्व केंद्रांवर संबंधित प्रभारींकडून कापूस खरेदीचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार हजारो क्विंटल कापसाची खरेदी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांकडील कापूस बऱ्याचअंशी विकला गेल्यानंतर 'सीसीआय'कडे जेमतेम २०० क्विंटलपर्यंत कापसाची दररोज आवक होत आहे. त्यामुळे केंद्र प्रभारींनी अन्य ठिकाणची कापूस खरेदी थांबवून सध्या फक्त तुरखेडे शिवारातील भगीरथ कॉटनस्पिनमध्ये कापसाची खरेदी सुरू ठेवली आहे. कापसाची मंदावलेली आवक लक्षात घेता २९ जानेवारीपर्यंत जेवढा काही कापूस केंद्रावर येईल, तो खरेदी केला जाईल. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी स्वच्छ, कोरडा तसेच कवडीविरहीत कापूस तुरखेडे शिवारातील भगीरथ कॉटनस्पिनवर विक्रीसाठी आणावा. अन्य ठिकाणी कापूस खरेदी होणार नाही तसेच मुदतीनंतर आवक झालेला कापूस मोजला जाणार नाही, असेही संबंधित केंद्र प्रभारींनी स्पष्ट केले आहे. तशी सूचना जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनासुद्धा एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.
-----