शासनाचे कोणतेही आदेश नसताना सीसीआयकडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:56+5:302020-12-23T04:13:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला दर ...

CCI reduces cotton price by Rs 115 without any government order | शासनाचे कोणतेही आदेश नसताना सीसीआयकडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

शासनाचे कोणतेही आदेश नसताना सीसीआयकडून कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता सीसीआयने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटिसा बजावल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव , सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिली भगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावरदेखील शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शासनाने ५७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला. प्रत खालावली असल्याचे कारण देत हमीभावात तब्बल ११५ रुपयांची घट केली आहे.

शेतकऱ्यांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

मंगळवारी शेतकरी आपला माल घेऊन आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सीसीआयने दरात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे दरात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

व्यापाऱ्यांना प्राधान्य, शेतकरी रांगेत

सीसीआयच्या केंद्रावरदेखील व्यापाऱ्यांचे काही दलाल सक्रिय झाले असून, व्यापाऱ्यांचा मालाला टोकन देऊन त्यांचा क्रमांक पुढे लावला जात आहे. यामुळे सीसीआयच्या केंद्रावर मंगळवारी काही प्रमाणात गोंधळदेखील झाला. दरम्यान, २८ डिसेंबरपर्यंत सीसीआयने आपली खरेदी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: CCI reduces cotton price by Rs 115 without any government order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.