बैलगाडीतील कापूस खरेदीस सीसीआयचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:15+5:302020-12-29T04:14:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ...

CCI refuses to buy bullock cart cotton | बैलगाडीतील कापूस खरेदीस सीसीआयचा नकार

बैलगाडीतील कापूस खरेदीस सीसीआयचा नकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ग्रेड कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी केवळ ट्रॅक्टर व ट्रकमधून माल घेण्याचा नवीन तुघलकी निर्णय सीसीआय व जिनिंगमालकांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर चांगलाच गोंधळ केला. तसेच शेतकऱ्यांना रांगेतच थांबवून खोटे उतारे देऊन व्यापाऱ्यांच्याच मालाला जिनिंगमालक व सीसीआयने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोमवारी आव्हाणे परिसरातील सीसीआयच्या दोन्ही केंद्रांवर सीसीआयने घेतलेल्या तुघलकी निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. सीसीआयने बंद केलेली खरेदी चार दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, केवळ ट्रक व ट्रॅक्टरमध्ये माल आणलेल्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा निर्णय जिनिंगमालकांनी घेतला. त्याच वेळेस बैलगाडीतून माल आणलेले १०० हून अधिक शेतकरी रांगेत उभे होते.

व्यापाऱ्यांना पायघड्या, शेतकरी मात्र रांगेत

गेल्या काही वर्षांपासून सीसीआयच्या केंद्रांवरदेखील व्यापारी व दलाल सक्रिय झाले आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी गावागावांत जाऊन कमी भावात माल खरेदी करणारे व्यापारीच आता सीसीआयच्या केंद्रावर मालविक्री करताना दिसून येत आहेत. व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४९०० भावात घेतलेला माल सीसीआयच्या केंद्रावर ५५९० ते ५६१५ या दरात विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांच्या गाड्यांना कोणतीही अडवणूक न करता थेट प्रवेश मिळत आहे. तर, शेतकऱ्यांना विक्रीसाठी एकदोन दिवस रांगेत थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत असून, सीसीआयच्या केंद्रावर दररोज गोंधळ होत आहे.

ग्रेडरच गैरहजर

सीसीआयच्या केंद्रांवर मुख्य ग्रेडरच गैरहजर राहत आहे. त्याठिकाणी नियुक्त केलेले ठरावीक कर्मचारीच ग्रेड लावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ग्रेडर कार्यालयातून बाहेरदेखील येत नसून, स्थानिक कर्मचारी मनमानी पद्धतीने ग्रेड लावत आहेत. यासह आपल्याच पद्धतीने कटतीदेखील लावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असून, शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप रमेश रामसिंग पाटील या शेतकऱ्याने केला.

शेतकऱ्यांचा वाद

सोमवारी खरेदी सुरू करण्यात येणार असल्याने रविवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टरमधून आपला माल आणून रांगा लावल्या होत्या. कडाक्याचा थंडीत रात्र काढून माल विक्रीसाठी थांबले. मात्र, सकाळी बैलगाडीतला माल खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच माल खरेदी न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला. वाद वाढत असल्याने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दोन तासांच्या वादानंतर माल खरेदीस परवानगी दिली. मात्र, माल खरेदी करतानाही शेतकऱ्यांच्या मालाला ग्रेड लावत, कटती लावत एकप्रकारे शेतकऱ्यांची लुटच करण्याचे काम सुरू होते.

कोट..

चार दिवसांनंतर खरेदी बंद होती. सोमवारपासून खरेदी सुरू होणार असल्याने रविवारी दुपारपासून बैलगाड्यांतून माल आणून रांगेत लागलो होतो. मात्र, केंद्र सुरू झाल्यानंतर बैलगाडीतून आणलेला माल खरेदी केला जाणार नाही, असा मनमानी निर्णय सीसीआयने घेतला. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही, त्यांनी माल आणावा तरी कशात? आधीच भाव कमी केला, आता मालदेखील खरेदी करत नाहीत.

- स्वप्नील जाधव, शेतकरी, फुफनगरी

Web Title: CCI refuses to buy bullock cart cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.