सीसीआय सुरु करणार ६४ कापूस खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:19 PM2018-10-03T13:19:46+5:302018-10-03T13:20:18+5:30
१५ आॅक्टोबरपासून शुभारंभ
अजय पाटील
जळगाव : राज्यभरात खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सप्टेंबर महिन्यातच सुरुवात झाली आहे. आता कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया(सीसीआय) देखील कापूस खरेदीस सुरुवात होणार आहे. राज्यभरात ६४ कापूस खरेदी केंद्र १५आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ‘सीसीआय’चे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
गेल्या वर्षी राज्यभरातील कापसाच्या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र, यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत नुकसान कमी असल्याने उत्पानात यंदा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील सीसीआयकडून राज्यात ६२ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. यावर्षी एकूण ६४ खरेदी केंद्रांपैकी ३५ केंद्र औरंगाबाद विभागात तर २९ केंद्र विदर्भात सुरु करण्यात येणार आहेत. सीसीआय प्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडून देखील यंदा ५५ कापूस खरेदी केंद्र राज्यात सुरु करण्यात येणार आहेत.
५५ लाख गाठींची निर्यात होणार
शासनाने कापसाचा दर यंदा ५ हजार ४५० प्रतिक्विंटल इतका दर निश्चित केला आहे. मात्र, कापसात ओलावा असल्याने दरात गेल्या आठवड्याभरात एक हजार रुपयांची घट झालीअसून ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे. दरम्यान, यंदा कापसाचा दर्जा चांगला असून, विदेशात देखील कापसाला मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ५० ते ५५ लाख गाठींची निर्यात होणार आहे. बांग्लादेश, चीनसह दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात केली जाते. मागणी जास्त असल्याने कापसाचे भाव देखील चढेच राहणार असल्याचा अंदाज कापूस खरेदी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
४० लाख हेक्टरवर कापसाची लागवड
यंदा राज्यभरात ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली कापूस लागवड २ लाख हेक्टरने कमी आहे. यंदा राज्यात ९० ते ९५ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१६ मध्ये राज्यात ७७ लाख तर २०१७ मध्ये ८८ लाख गाठींचे उत्पादन झाले होते.
खान्देशात १३ केंद्रावर होणार खरेदी
सीसीआयच्या औरंगाबाद विभागात येणाऱ्या जळगाव,धुळे व नंदुरबार या जिल्ह्णात १३ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची शक्यता आहे.