सीसीआय सुरु करणार राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 10:11 PM2017-10-10T22:11:07+5:302017-10-10T22:12:29+5:30
राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
आॅनलाईन लोकमत, अजय पाटील
जळगाव, दि.१०-राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राज्यभरात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागांमध्ये बागायती कापूससह पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्नन्न होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरातील खासगी जिनींग मालकांनी आपल्या जिनींग मध्ये कापूस खरेदीस सुरुवात केली असून, लवकरच शासकीय कापूस खरेदी केंद्र देखील सुरुवात होणार आहे. सीसीआयकडून राज्यभरात सुरु होत असलेल्या ६४ केंद्रामध्ये ३५ केंद्र औरंगाबाद विभागात तर २९ केंद्र अकोला विभागात सुरु करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी सीसीआयकडून ५८ खरेदी केंद्र सुुरु केले होते.
४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड
गेल्या वर्षी राज्यात ३९ लाख हेक्टरवर जमिनीवर कापूस लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत ३ लाख हेक्टर म्हणजेच ४२ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात देखील वाढणार होणार आहे. गेल्यावर्षी राज्यातुन ७७ लाख गाठींचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा ९० लाख गाठींचे उत्पन्न हेण्याचा अंदाज आहे. सीसीआय प्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडून देखील यंदा राज्यात ६० खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.
निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम
शासनाने जरी ४ हजार ३२० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. तर खासगी जिनींगमध्ये सध्या ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी होत आहे. यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्टÑीय बाजारावर कापसाचे दर निश्चित होणार आहेत. भारताकडून बांग्लादेश, चीन व दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात होते. गेल्या वर्षी महाराष्टÑातुन ४५ लाख गाठींची निर्यात झाली होती. यंदा ५० लाख गाठींची निर्यात विदेशात होण्याची शक्यता आहे. तसेच चीन, इंडोनेशिया मध्ये कापसाची मागणी वाढल्यास दर देखील वाढू शकतात. मात्र डिसेंबर पर्यंत तरी कापसाचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज कापूस उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.