सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ कार्यान्वित करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:36+5:302021-06-24T04:12:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ कार्यान्वित करावेत, अशी मागणी युवा शक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ कार्यान्वित करावेत, अशी मागणी युवा शक्ती प्रतिष्ठानने केली आहे.
मुक्ताईनगर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे दृश्य शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या प्रवर्तन चौकात २० जून रोजी नागरिकांना उघड्या डोळ्यांनी अनुभवास आले. ही घटना मुक्ताईनगर शहरातील शांततेचा भंग करणारी आहे. काही दिवसांपासून अशा प्रकारच्या अनेक घटना शहर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच अनेक दिवसांपासून काही बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शहरात वावर वाढल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अशा घटनांमधून मुक्ताईनगर शहरसुद्धा दहशतीचा अड्डा बनतो की काय, अशी शहरवासीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी मुक्ताईनगर शहरात गर्दीच्या तसेच वर्दळीच्या अनेक ठिकाणी अशा लोकांच्या प्रवृत्तीवर व कृत्यावर नजर ठेवली जावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर काही दिवसांनीच ते कॅमेरे बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारांना कुठलीही भीती किंवा वचक राहिला नसल्याने यापुढे यापेक्षाही भयंकर घटना नाकारता येत नाही. तरी अशा घटना रोखण्यासाठी त्यावर नजर ठेवण्यासाठी बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ सुरू करण्यात यावेत तरी हे कॅमेरे येत्या आठ दिवसात बसवण्यात यावेत, अशी मागणी युवाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज कोळी, सामाजिक कार्यकर्ते ॲड.राहुल पाटील, हर्षल नपते, अर्जुन कोळी, योगेश सोनार, भूषण कांडेलकर, नरेश मराठे आदी उपस्थित होते.