आदर्श संहितेनुसारच गणेशोत्सव साजरा करा-डीवायएसपी नरेंद्र पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 06:19 PM2020-08-19T18:19:54+5:302020-08-19T18:21:37+5:30
यावल येथे शांतता समितीची बैठक झाली.
यावल, जि.जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेमून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसारच गणेशोत्सव व मोहरम साजरा करा. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले.
गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्याची शांतता बैठक तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस ठाण्यात घेण्यात आली.
इच्छुक गणेशोत्सव मंडळाने नियमाचे पालन करणार आहोत, असे हमीपत्र पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर त्या मंडळांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगून विसर्जन मिरवणुकीबाबतही मंडळांना दक्षता पाळावयाच्या असल्याचे सांगितले.
पालिकेचे कार्यालय अधीक्षक विजय बडे यांनी सांगितले की, मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पालिकेडून दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.
वीज कंपनीचे सहायक अभियंता दमाडे यांनी सार्वजनिक उत्सवासाठी अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे सांंिगतले.
तहसीलदार जितें्रद कुवर यांनीही प्रशासनाने दिलेल्या नियमानुसारच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
हाजी शब्बीरखान मोहम्मदखान यांनी सांगितले की, शहरात मोहरमचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार, तर चार दिवसाने येणारा पेहरन उत्सवही शासनाने सुचविलेल्या नियमानुसार पार पडेल अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक पो. नि. अवतारसिंग चव्हाण यांनी केले.