गणेशोत्सव शांततेत साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:37 AM2018-09-06T00:37:54+5:302018-09-06T00:38:23+5:30
यावल येथे बैठकीत अपर पोलीस अधीक्षक मतानी यांचे आवाहन
यावल, जि.जळगाव : गणेशोत्सवाची सुरूवातीपासून तर निर्विघ्नपणे विसर्जन होईस्तोवर आदर्श आचारसंहितेचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी बुधवारी येथील पोलीस ठाण्यात शहर व तालुक्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकारी बैठकीत केले.
मिरवणुकीसाठी डी.जे.ला अजिबात परवानगी नाही. पारंपरिक वाद्याचाच वापर करा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीस भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी उपस्थित होते.
आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी येथील पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजीत केली होती. याप्रसंगी बोलताना मतानी यांनी सांगितले की, उत्सव काळात मंडळाच्या पदाधिकाºयांनी अतिशय दक्ष राहून उत्सव साजरा करावयाचा आहे. अनेक वेळा उत्सवा दरम्यान आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी अग्नीप्रतीबंधक साधणे मंडपात असणे गरजेचे आहे. तसेच ‘श्री’च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवरही नजर ठेवा, कोणी अनोळखी अथवा संशयित इसम वाटल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, यासह उत्सव काळात व मिरवणुकीच्या दिवशी श्री च्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. मिरवणुकीच्या वाहनावर दर्शनी भागात मंडळाचे पदाधिकारी यांचे मोबाइल नंबर्सचा फलक लावा, मिरवणुकीत कोणी गैरप्रकार करीत असताना आढळल्यास पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उत्सव काळापासून तर विसर्जनापर्यंतच्या अवलोकनानंतर पोलिसांकडून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी डीवायएसपी राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय मानवअधिकार संस्थेकडून उत्कृष्ट गणेशोेत्सव मंडळांना प्रथम १५०१ व चषक, व्दितीय १००१ व चषक आणी तृतीय ५०१ आणि चषक असे बक्षीस देण्याची घोषणा प्रसंगी अॅड.नितीन चौधरी यांनी केली
बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी गणेश मंडळांना शासनाची मातृवंदना योजना, स्वाईन फ्ल्यू, गोवर लसीकरण आणि रूबेला आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले तर गोवर, रूबेला आजाराचे सन २०१९ अखेर उच्चाटन करण्याचा निर्धार ओराग्य विभागाचा असुन त्यास ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना या काळात लसीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी केले.