वराडसीम येथे पारंपरिक मात्र वैशिष्ट्यपूर्ण बैलपोळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 07:36 PM2018-09-09T19:36:08+5:302018-09-09T19:36:58+5:30
दोन बाय तीन फुटांच्या खिडकीतून उडी मारली बैलाने, बैलाच्या धडकेत शेतकऱ्यासह दोन जण जखमी
उत्तम काळे/भास्कर सोनार
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील पारंपरिक तसेच वैशिष्ट्यपूर्ण ठरणाºया पोळ्याच्या सणानिमित्त जोगलखोरी येथील गजानन सुरेश पाटील यांच्या बैलाने गाव दरवाजाच्या अडीच बाय तीन फुटांच्या खिडकीतून उडी घेऊन पोळा फोडण्याचा मान मिळवला आहे. या वेळी पोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक व गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दुपारी तीन वाजता पोलीस पाटील सचिन वायकोळे, माजी सरपंच विलास पाटील, प्रशांत खाचणे, सुभाष कोळी, मनोज कोल्हे, सुनसगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.पी. सपकाळे, गोपाळ पढार, प्रकाश जोहरे, कैलास सपकाळे, कैलास कोल्हे, मंगेश डोळसे, संजय डाके, किशोर डाके, दिगंबर वाणी, निवृत्ती मावळे, संतोष सावळे, कृष्णा पाचपांडे, तलाठी पवन नवगाळे , भिका पाटील आदींनी दरवाजा बंद केला. त्यानंतर अडीच बाय तीन फुटाची खिडकी उघडली. या खिडकीतून जोगलखोरी येथील पाटील यांच्या बैलाने प्रथम प्रवेश करून बैल फोडण्याचा मान मिळवला तर द्वितीय क्रमांक शुभम शांताराम जंगले व तृतीय क्रमांक समाधान देशमुख यांच्या बैलांनी पटकावला.
सरपंचांच्या हस्ते झाले मानाच्या बैलाचे पूजन
सरपंच गीता प्रशांत खाचणे यांच्या हस्ते मानाच्या बैलांची पूजन करण्यात आले. या वेळी बैल मालकांना १०१ रुपया व नारळ देण्यात आले. प्रसंगी उपसरपंच प्रीती संजय डाके, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना विलास पाटील, प्रतिभा जंगले, सदस्य प्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.
नारायण पाटील यांच्या नावाने बसवला आहे दरवाजा
नारायण राघो पाटील यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी ३५० ते ४०० वर्षांपूूर्वी हा दरवाजा बसला आहे. त्यावेळी गावात कोणीही प्रवेश केला तरी त्याची प्रथम खिडकीमधून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतरच त्याला खिडकीद्वारे प्रवेश देण्यात येत होता. कालांतराने दरवाजा उघडा करण्यात आला. मात्र केवळ पोळ्याच्या दिवशी हा दरवाजा बंद करून व खिडकी उघडून केवळ बैलपोळा फोडण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ती परंपरा अद्यापही सुरू आहे.
दरम्यान, पोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोळा फुटण्याच्या वेळेस तर तोबा गर्दी झाली होती.
बैलाच्या धडकेत एक जखमी
दरम्यान, पोळा फोडण्यापूर्वी तब्बल एक ते दीड तास दरवाजाच्या बाहेर बैलांना खिडकीतून उडी मारण्यासाठी शेतकरी बैलांची बसस्थानकापासून धावत आणत दौंड लावत होते. यामध्ये सुनील पाचपांडे या तरूण शेतकºयाला बैलाने शिंगाने मारल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुसावळ येथे नेण्यात आल्याचे उपस्थितांमधून सांगण्यात आले.
१०० पोलिसांनी ठेवला बंदोबस्त
तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी व गजानन कोंडवाल, एएसआय अरुण जाधव पो.कॉ. हर्षवर्धन सपकाळे यांच्यासह तालुका व बाजारपेठेचे पोलीस कर्मचारी, आरसीबी प्ल्याटून, कॅमेरा व्हेन तैनात करण्यात आली होती. तब्बल १०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित असल्याचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले.