भजन, कथाकथन, गीत गायनाने रंगला गोकुळाष्टमीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:38 PM2020-08-12T20:38:34+5:302020-08-12T20:57:58+5:30
विद्यार्थ्यांनी साकारली राधा-कृष्णाची वेशभूषा : घरीच फोडली चिमुकल्याची दहीहंडी
जळगाव : शहरातील शाळांकडून गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरीच राधा-कृष्णाची वेशभूषा साकारून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. नंतर प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच शाळांकडून आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन, गीत गायन, भजन आदी आॅनलाईन स्पर्धांनी गोकुळष्टमीच्या उत्सवात रंगत आणली होती. तर रित संदीप पाटील या चिमुकल्या विद्यार्थिनीनेही श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती.
राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक माध्यमिक व सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे गोकुळाष्टमी व दहीहंडी कार्यक्रम आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. नगरसेविका जयश्री महाजन यांनी श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी व दहीहंडी यांचे शास्त्रीय महत्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा यांची वेशभूषा साकारली होती.
किलबिल बालक मंदिर
किलबिल बालक मंदिर शाळेत गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी व शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गोकुळाष्टमी साजरी केली. त्यानंतर शिक्षकांनी भजन म्हटले़ तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये दहीहंडी साजरी न करता विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा साकारली होती.
डॉ. अविनाश आचार्य विद्यालय
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात आॅनलाईन व्हिडिओव्दारे गोकूळाष्टमी सण साजरा केला. यावेळी कार्यक्रम प्रमुख विद्या वाडकर यांनी भगावन श्रीकृष्णाबद्दलची माहिती सांगून गोपालकाल्याचे महत्त्व स्पष्ट केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, गोपिका या वेशभुषेत गोपालकाला बनवून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.