सिमेंट, स्टीलचे भाव भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:36+5:302020-12-24T04:15:36+5:30
जळगाव : सिमेंट, स्टील या कच्च्या मालाच्या भावाने उड्डाण घेतल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. कोविडपूर्व दराच्या तुलनेत सिमेंट ...
जळगाव : सिमेंट, स्टील या कच्च्या मालाच्या भावाने उड्डाण घेतल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. कोविडपूर्व दराच्या तुलनेत सिमेंट २३ आणि स्टील तब्बल ४५ टक्क्यांनी वधारले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कच्च्या मालात होत असलेली भाववाढ नियंत्रित करावी, अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनने (क्रेडाई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे बांधकाम उद्योगासह इतर उद्योगही बाधित झाले आहेत. कोरोनापूर्व काळातच बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. कोरोनाकाळात त्यात अधिक भर पडली. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही महिने काम बंद होते. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर गावी गेलेल्या मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे काम बाधित झाले. आता कच्च्या मालातील भाववाढीमुळे बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रेडाईने कच्च्या मालाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकाला साकडे घातले आहे.
विकल्या न गेलेल्या सदनिका आणि निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. त्याच जोडीला सदनिकेला मागणीही बेताचीच आहे. कोविडमुळे बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. त्यामुळे कच्च्या मालातील वाढत्या भावात हस्तक्षेप करून ते तत्काळ नियंत्रित करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
बांधकाम क्षेत्रावर ४० दशलक्ष नागरिक अवलंबून आहेत. तर, जवळपास अडीचशे उद्योग त्यावर अवलंबून आहेत. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक काम करीत आहेत, असे असताना सरकार बांधकाम क्षेत्राला पुरेसा पाठिंबा देत नसल्याची भावना बांधकाम क्षेत्राची झाली आहे. सरकारने तातडीने पावले उचलत स्टील आणि सिमेंटचे भाव नियंत्रणात आणण्याची मागणी क्रेडाईने केली आहे, अशी माहिती क्रेडाईचे राज्य सहसचिव अनिश शहा, क्रेडाई जळगावचे अध्यक्ष निर्णय चौधरी, सचिव पुष्कर नेहेते यांनी दिली.