सलग दुसऱ्या वर्षी होणार नाही प्राणीगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:34+5:302021-05-11T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून वनक्षेत्रात जाऊन प्राणीगणना केली जाते तसेच या मोहिमेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून वनक्षेत्रात जाऊन प्राणीगणना केली जाते तसेच या मोहिमेत स्थानिक वन्यजीवप्रेमी व वन्यजीव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनादेखील समाविष्ट करून घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणीगणना यावर्षी होणार नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सातपुडा वनक्षेत्रात डोलारखेडा, चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर अजिंठा परिसर या क्षेत्रात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना केली जात असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वनक्षेत्रदेखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यात यावल व जळगाव वनविभागातील अनेक कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक कर्मचारी या प्राणी गणनेेपासून दूर राहू शकतात. तसेच यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावदेखील अजून इतर कर्मचाऱ्यांनादेखील होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने यावर्षीदेखील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री होणारी प्राणीगणना यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाकडूनदेखील काही दिवसात आदेश प्राप्त होतील, अशीही शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. प्राणीगणनेमध्ये वनविभागासह अनेक पर्यावरण अभ्यासक व काही पर्यावरण संस्थेचे पदाधिकारीदेखील सहभागी होत असतात. मात्र २०१९मध्ये प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे प्राणीगणनेत सामाजिक व पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनादेखील दूर ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे २०१९मध्येदेखील व्यवस्थित व पारदर्शकपणे प्राणीगणना होऊ शकली नव्हती. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या संख्येबाबत अद्यापही ठोस माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
वाघांची ठोस संख्या उपलब्ध नाही
जिल्ह्यातील सातपुडा वनक्षेत्रातील लंगडा आंबा, यावल अभयारण्य, जळगाव वनक्षेत्रातील डोलारखेडा व वडोदा या भागात वाघांचे अस्तित्व अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मात्र जिल्ह्यातील वाघांची संख्या किती याबाबत वनविभागाकडे ठोस संख्या उपलब्ध नाही. जिल्ह्यात सहा वाघ अस्तित्वात असून, डोलारखेडा भागात अनेकवेळा वाघांचे दर्शनदेखील झाले आहे. मात्र ही आकडेवारी गेल्या पाच वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात किती वाघ अस्तित्वात आहेत याबाबत वनविभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसून, याबाबत तसे प्रयत्नदेखील वनविभागाकडून होताना दिसून येत नाही.
बुद्ध पौर्णिमेला का होते प्राणीगणना
दरवर्षी, बुद्धपौर्णिमेलाच राज्यभरातील वनक्षेत्रात प्राणीगणना होत असते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश हा वर्षातील इतर पौर्णिमेच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वनक्षेत्रातील पाणवठ्यांवर वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून रात्रभर जागरण करून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचा संख्येवरून वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली याबाबत अंदाज लावला जातो.
कोट..
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीदेखील प्राणीगणना होऊ शकली नव्हती. यावर्षीदेखील स्थितीत काहीही बदल झालेला नाही. त्यात वनविभागाचे अनेक कर्मचारीदेखील बाधित आहेत. अशा परिस्थितीत प्राणीगणना होणे कठीण आहे. शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झाले नसले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
-विवेक होशिंगे, उपवनसंरक्षक, जळगाव वनक्षेत्र