वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले
By निलेश जोशी | Published: November 20, 2022 12:32 PM2022-11-20T12:32:23+5:302022-11-20T12:32:35+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही.
जळगाव जामोद:
छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात अवाजवी व वादग्रस्त वक्तव्य करणाºया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्राने तात्काळ परत बोलवावे, अशी मागणी आपण केंद्राकडे करणार आहोत. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपने या प्रश्नी महाराष्ट्राची माफी मागावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी जयराम रमेश, एच.के पाटील, बाळासाहेब थोरात, अतुल लोंढे यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. एक प्रकारे वैचारिक सफाई करण्याचा प्रकार भाजपकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे इंग्रजांकडून सावरकर ६० रुपयांची पेन्शन घेत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त व्यक्तव्य केली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे तोल सुटलेल्या राज्यपालांना केंद्राने त्वरीत माघारी बोलवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपतींचा इतिहास कलुषीत करण्याचे भाजपचे मनसुबे!
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याची घोषणा करणारी भाजप आज शिवाजी महाराजासंदर्भातच सुधांशू त्रिवेदीच्या माध्यमातून अपशब्द वापरत आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच ते आता समुद्रात बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे प्रकरणी भाजपने माफी न मागितल्यास भाजपवाल्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोकठोक इशाराही त्यांनी यावेळी दिला.